मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग यांना जेतेपदाची हुलकावणी; १०-३ अशा आघाडीनंतर अंतिम फेरीत हाराकिरी

लढतीच्या पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने निर्विवाद वर्चस्व राखले. शनिवारी उपांत्य फेरीत पिछाडीवरून सरशी साधणाऱ्या सात्त्विक-चिरागने दुसऱ्या गेममध्येही कडवी झुंज दिली.
मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग यांना जेतेपदाची हुलकावणी; १०-३ अशा आघाडीनंतर अंतिम फेरीत हाराकिरी

क्वालालम्पूर : भारताची तारांकित बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना रविवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. अंतिम फेरीतील निर्णायक तिसऱ्या गेममध्ये एकवेळ १०-३ अशी आघाडी असूनही त्यानंतर हाराकिरी केल्यामुळे भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत लियांग वेई केंग आणि वँग चँग या चीनच्या अग्रमानांकित जोडीने भारताच्या द्वितिय मानांकित जोडीला ९-२१, २१-१८, २१-१७ असे तीन गेममध्ये नेस्तनाबूत केले. २३ वर्षीय सात्त्विक व २६ वर्षीय चिराग यांनी एक तासाहून अधिक वेळ झुंज दिली. मात्र जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या चीनच्या जोडीविरुद्ध निर्णायक गेममध्ये दडपणाखाली त्यांचा खेळ खालावला. खेलरत्न पुरस्कार विजेत्या सात्त्विक-चिरागचे आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया ओपन स्पर्धेत जेतेपदाकडे लक्ष्य असेल. ७५० सुपर गुणांचा दर्जा असलेली ही स्पर्धासुद्धा ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने मोलाची आहे.

लढतीच्या पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने निर्विवाद वर्चस्व राखले. शनिवारी उपांत्य फेरीत पिछाडीवरून सरशी साधणाऱ्या सात्त्विक-चिरागने दुसऱ्या गेममध्येही कडवी झुंज दिली. अखेर तिसरा गेम सुरू झाल्यावर ते दोघे सुरुवातील १०-३ मग ११-७ असे आघाडीवर होते. मात्र तेथून भारतीयांनी क्षुल्लक चुका केल्या. तसेच चीनच्या जोडीने अफलातून खेळ करत भारतीयांना चुका करण्यास भाग पाडले. चीनच्या जोडीविरुद्ध सात्त्विक-चिरागचा हा एकंदर चौथा पराभव ठरला. २०२३मध्ये त्यांनी या जोडीकडून तीन वेळा पराभव पत्करला होता.

आम्ही या स्पर्धेत उत्तम खेळ केला. मात्र अंतिम फेरीत आम्हाला निर्णायक वेळी खेळ उंचावता आला नाही. पहिला गेम जिंकूनही चीनचे प्रतिस्पर्धी पुनरागमन करतील, याची अपेक्षा होती. आता इंडिया ओपन स्पर्धेत जेतेपदासाठी आणखी मेहनत घेऊ.

- सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in