पुण्याचा मानस भारतीय संघात; दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी प्रथमच संधी

दक्षिण कोरियाविरुद्ध सेऊल येथे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डेव्हिस कप टेनिस पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताच्या मुख्य संघात १९ वर्षांच्या मानस धामणेला प्रथमच पाचारण करण्यात आले आहे.
पुण्याचा मानस भारतीय संघात; दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी प्रथमच संधी
पुण्याचा मानस भारतीय संघात; दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी प्रथमच संधी
Published on

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाविरुद्ध सेऊल येथे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डेव्हिस कप टेनिस पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताच्या मुख्य संघात १९ वर्षांच्या मानस धामणेला प्रथमच पाचारण करण्यात आले आहे. नेदरलँड्सविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या मुख्य खेळाडूंना कायम ठेवताना निवड समितीने मानसला संघात स्थान दिले आहे.

जागतिक क्रमवारीत ३६२व्या स्थानी असलेला आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा एकेरी खेळाडू मानस दीर्घकाळापासून वरिष्ठ संघाचे दार ठोठावत होता. भारताच्या एकेरी गटात अनुभवी सुमित नागल (क्रमांक २३५) आणि बंगळुरू येथील लढतीचा हिरो ठरलेला दक्षिणेश्वर सुरेश (क्रमांक ३९३) यांचा समावेश आहे. दुहेरीत युकी भांबरी (क्रमांक २८) आणि एन. श्रीराम बालाजी (क्रमांक ५७) ही जोडी कायम ठेवण्यात आली आहे. तर सिद्धार्थ रावत (क्रमांक ५३६) आणि ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये खेळलेला अर्णव पापारकर या दोघांना राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

बहुतांश खेळाडूंची निवड ही त्यांच्या कामगिरीच्या जोरावर आपोआपच झाली असल्याचे निवड समितीच्या सदस्याने सांगितले. मागील सामन्यात मानस उपलब्ध नव्हता, मात्र यावेळी तो उपलब्ध आहे. तो मुख्य संघात असला तरी येथील परिस्थितीनुसार त्याला खेळवायचे की अन्य एकेरी खेळाडूंना संधी द्यायची, याचा निर्णय कर्णधार घेईल, असे स्पष्ट करताना भविष्यातील पिढी घडवण्याच्या दृष्टीने अर्णवचा संघात समावेश केल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताने फेब्रुवारी महिन्यात बंगळुरू येथे नेदरलँड्सचा ३-२ असा पराभव केला होता. २०१९ मध्ये डेव्हिस कपचे स्वरूप बदलल्यानंतर भारताने पहिल्यांदाच क्वालिफायर्सच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारतीय संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवत गाभा कायम ठेवण्यात आला असून केवळ मानस धामणेच्या रूपाने मुख्य संघात बदल करण्यात आला आहे.

२६ वर्षांच्या दक्षिणेश्वरने नेदरलँड्सविरुद्ध दोन्ही एकेरी सामने जिंकले होते आणि युकी भांबरीच्या साथीने दुहेरीतही विजय मिळवला होता. त्याने पाचव्या आणि निर्णायक सामन्यात जागतिक क्रमवारीत १६२व्या स्थानी असलेल्या गाय डेन ओउडेनचा ६-४, ७-६ असा पराभव करून भारताचा ३-२ असा विजय पक्का केला होता. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या नेदरलँड्सला नमवून भारताने १५ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.

दुसऱ्या बाजूला दक्षिण कोरियाने पहिल्या फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध १-२ असे पिछाडीवर पडल्यानंतर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता. सूनवू क्वोन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा माजी उपांत्यफेरीतील खेळाडू ह्यून चांग यांनी अंतिम दिवशी एकेरीचे सामने जिंकून कोरियाला विजय मिळवून दिला होता. सेऊल येथील लढतीतील विजेता संघ नोव्हेंबर महिन्यात बोलोनिया येथे होणाऱ्या ‘डेव्हिस कप फायनल ८’ साठी पात्र ठरणार आहे.

एकूणच भारतीय टेनिससाठी आता ही लढत निर्णायक ठरेल. मानसच्या कामगिरीवर संपूर्ण राज्यासह देशवासियांचे लक्ष असेल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत चाहत्यांना विदेशी खेळाडूंचा खेळ पाहता येईल.

टेनिसची सद्यस्थिती

भारतीय टेनिसची सद्यस्थिती अन्य देशांतील टेनिसच्या तुलनेत नक्कीच गंभीर आहे. रोहन बोपण्णाच्या निवृत्तीनंतर आता भारतीय खेळाडूंना ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांसाठी थेट पात्र ठरणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडू अन्य देशांना नमवून आपला दर्जा वाढवतील, अशी आशा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in