मनूचा ऐतिहासिक दुहेरी कांस्यवेध! सरबजोतच्या साथीने १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात पदकाला गवसणी

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू. सरबजोतच्या साथीने १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात पदकाला गवसणी.
मनूचा ऐतिहासिक दुहेरी कांस्यवेध! सरबजोतच्या साथीने १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात पदकाला गवसणी
Published on

चेटेरॉक्स (फ्रान्स) : भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने मंगळवारी ऐतिहासिक निशाणा साधला. पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिने दुसरे पदक पटकावण्याचा पराक्रम केला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भारताची आजवरची पहिलीच खेळाडू ठरली आहे. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबजोतच्या साथीने मनूने कांस्यपदकाची कमाई केली. नेमबाजीत प्रथमच भारताने मिश्र प्रकारात पदक काबीज केले, हे विशेष.

चेटेरॉक्स येथील राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत मनू आणि २२ वर्षीय सरबजोत यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओ ये जिन या जोडीवर १६-१० असे वर्चस्व गाजवले. मनूने दोन दिवसांपूर्वीच महिलांच्या वैयक्तिक १० मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिने दुसरे पदक प्राप्त करतानाच भारताची पदकसंख्याही दोनपर्यंत नेली. भारतीय संघ सध्या पदकतालिकेत २ कांस्यपदकांसह २८व्या स्थानी आहे.

सोमवारी पात्रता फेरीत मनू व सरबजोत यांनी ५८० गुण कमावून तिसरे स्थान मिळवले. मग मंगळवारी या दोघांनी सुरुवातीपासूनच वर्चस्वपूर्ण खेळ केला. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बंदुकीत झालेला बिघाड, प्रशिक्षकांशी वाद आणि अपेक्षांचे ओझे पेलण्यात आलेले अपयश यांसारख्या नकारात्मक बाबींना बाजूला सारून यंदा मनूने चाहत्यांची मने जिंकणारी कामगिरी केली. तिला सरबजोतनेही उत्तम साथ दिल्याने सध्या या दोघांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यापूर्वी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन पिचार्ड या खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व करताना २०० मीटर शर्यत व अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदके जिंकली होती. मात्र, त्यांनी ग्रेट ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्याने अनेकदा त्यांच्या पदकाची भारताच्या खात्यात गणना केली जात नाही. दरम्यान, मनू मात्र स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके काबीज करणारी एकमेव क्रीडापटू ठरली आहे. मनू २५ मीटर पिस्तूल प्रकारातही सहभागी होणार असून त्यामध्येही ती पदक जिंकण्यात यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दडपणातही आम्ही दमदार कामगिरी नोंदवून देशासाठी पदककमाई केल्यामुळे फार आनंदी आहे. एकेरीत मला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले, मात्र मनूच्या साथीने पदक जिंकण्याची खात्री होती. हे पदक माझे कुटुंब, प्रशिक्षक आणि तमाम देशवासीयांना समर्पित करतो.

- सरबजोत सिंग

भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्याचा अभिमान आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. माझ्या भावना नेमक्या शब्दांत मांडणे कठीण आहे.

- मनू भाकर

दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनू ही एकंदर भारताची तिसरी खेळाडू आहे. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार (२००८मध्ये कांस्य, २०१२मध्ये रौप्य) आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (२०१६मध्ये रौप्य, २०२०मध्ये कांस्य) यांनी अशी कामगिरी केली आहे. मात्र त्यांनी विविध ऑलिम्पिकमध्ये ही पदके जिंकली, तर मनूने एकाच स्पर्धेत हा पराक्रम केला.

भारतासाठी हे नेमबाजीतील एकूण सहावे पदक ठरले. यापूर्वी राज्यवर्धनसिंग राठोड (२००४, रौप्य), अभिनव बिंद्रा (२००८, सुवर्ण), विजय कुमार (२०१२, रौप्य), गगन नारंग (२०१२, कांस्य), मनू (२०२४, कांस्य) या नेमबाजांनी पदक प्राप्त केले होते.

logo
marathi.freepressjournal.in