मनूची पदकांची 'हॅटट्रिक हुकली'! महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात चौथ्या क्रमांकावर मजल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नवत अशी कामगिरी करणाऱ्या नेमबाज मनू भाकरची घोडदौड तिसऱ्या पदकाविनाच संपुष्टात आली.
मनूची पदकांची 'हॅटट्रिक हुकली'! महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात चौथ्या क्रमांकावर मजल
Twitter
Published on

चटेरॉक्स (फ्रान्स) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नवत अशी कामगिरी करणाऱ्या नेमबाज मनू भाकरची घोडदौड तिसऱ्या पदकाविनाच संपुष्टात आली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साधण्याची तिची संधी थोडक्यात हुकली.

अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत मनू भाकरने काही वेळ अव्वल क्रमांकावर मजल मारली होती, पण तिला आपल्या कामगिरीत सातत्य राखता न आल्याने मनूची चौथ्या क्रमांकावर

घसरण झाली. यासह मनूचे पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी ती दोन पदकांसह आता मायदेशी परतणार आहे. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावले असून १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातही सरबज्योत सिंगच्या साथीने कांस्यपदकावर कब्जा केला आहे.

मनू भाकरने तीन सीरिजमध्ये १० गुण घेताना दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण चौथ्या सीरिजनंतर मनूची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि ती व्हिएतनामच्या खेळाडूसह १३ गुणांसह बरोबरीत राहिली. पाचव्या सीरिजमध्ये मनूने पाच अचूक लक्ष्य भेदून जबरदस्त पुनरागमन केले आणि १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. हंगेरियाची मेजोर व्हेरॉनिका १९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.

सहाव्या सीरिजमध्ये मनूने पाचपैकी चार शॉट्स अचूक साधले आणि २२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पण अन्य नेमबाजांकडून तिला कडवी टक्कर मिळत होती. महत्त्वाच्या क्षणी केलेली एक चूक कोणत्याही खेळाडूला महागात पडणारी ठरली असती. फ्रान्सची कॅमिल आणि मेजॉर यांचे कडवे आव्हान मनूसमोर असताना तिने सातव्या सीरिजमध्ये पुन्हा एकदा पाचपैकी चार शॉट्स अचूक मारून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली होती. पण, फ्रान्सची कॅमिल २६ गुणांसह मनूसह बरोबरीत होती. कोरियाची यांग जिन २७ गुणांसह अव्वल स्थानी होती. आठव्या सीरिजमध्ये मनूचे दोन शॉट्स चुकले आणि ती २८ गुणांसह तिसऱ्या स्थानी फेकली गेली. यावेळी हंगेरीच्या मेजॉर व्हेरॉनिका (२८) हिच्यासह झालेल्या शूट-ऑफमध्ये मनूला कामगिरी उंचावता आली नाही. शूट-ऑफमध्ये मनूचे पाचपैकी तीन शॉट्स अचूक लागले तर व्हेरोनिकाने चार वेळा अचूक लक्ष्यभेद करत कांस्यपदकाला गवसणी घातली. दक्षिण कोरियाच्या यँग जिन हिने सुवर्णपदक पटकावले तर फ्रान्सच्या कॅमिली जेडरझेवेस्की हिने रौप्यपदकावर नाव कोरले.

“चौथ्या स्थानावर पोहोचले तरी या कामगिरीतूनही मी बोध घेणार असून २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. ही ऑलिम्पिक स्पर्धा माझ्यासाठी लाभदायी ठरली असली तरी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये याहीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. दोन पदकाने मी सुखावले आहे,” असे मनूने या लढतीनंतर सांगितले.

मनू भाकरची प्रतिक्रिया

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनू भाकरचे कांस्यपदक थोडक्यात हुकले असले तरी माझ्यावर तिसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक पटकावण्याचे कोणतेही दडपण नव्हते, असे मनूने स्पष्ट केले. या प्रकारात मनूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके पटकावणारी मनू भाकर ही पहिली खेळाडू ठरली आहे. “दोन पदके जिंकल्यानंतर माझे प्रशिक्षक जसपाल राणा सरांनी मला जमिनीवर म्हणजेच भानावर येण्याचा सल्ला दिला होता. तू जिंकलेली दोन पदके हा इतिहास झाला. आता तुला भविष्यात कशी चांगली कामगिरी करायची आहे, याचा विचार कर, असा सल्ला मला त्यांनी दिला होता. जसपाल सरांमुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. मी माझ्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र चांगल्या लढतीनंतरही मला पदक जिंकता आले नाही. चौथा क्रमांक ही फारशी चांगली कामगिरी नसली तरी मी यापुढे माझा खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेन,” असे मनूने सांगितले.

“यावेळी माझी सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यामुळे मी पदकाच्या शर्यतीत येण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही वेळा माझी कामगिरी चांगली झालीही. पण अखेर मला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र मी माझ्या परीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा मला पश्चात्ताप होत नाही,” असेही मनू म्हणाली.

logo
marathi.freepressjournal.in