India at Olympics, Day 4 Full Schedule: मनू-सरबजोतची आज कांस्यपदकासाठी दावेदारी! बघा भारताचे ३० जुलैचे वेळापत्रक

Paris 2024 Olympics: मनू भाकर आणि सरबजोत सिंग या भारतीय जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत स्थान मिळवले.
India at Olympics, Day 4 Full Schedule: मनू-सरबजोतची आज कांस्यपदकासाठी दावेदारी! बघा भारताचे ३० जुलैचे वेळापत्रक
AP
Published on

चेटेरॉक्स (फ्रान्स) : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नेमबाजीतूनच भारताला पदकाच्या प्रामुख्याने आशा होत्या. या आशा कायम राखताना मनू भाकर आणि सरबजोत सिंग या भारतीय जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत स्थान मिळवले. आता मंगळवारी ते भारतासाठी पदक जिंकण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे कडवे आव्हान असेल. याव्यतिरिक्त, भारताच्या अन्य नेमबाजांच्या पदरी मात्र निराशा पडली.

२२ वर्षीय मनूने रविवारी ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात एकेरीत कांस्यपदक जिंकताना भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज ठरण्याचा मान मिळवला. तसेच मनूने यंदाच्या स्पर्धेत भारताचे पदक खाते उघडले. सोमवारी मग मनू व सरबजोत यांनी मिश्र सांघिक प्रकारात दमदार कामगिरी केली. या दोघांनी एकूण ५८० गुण कमावून तिसरे स्थान मिळवले. आता मंगळवारी त्यांची कोरियाच्या ओ ये जिन व ली वोन्हो या जोडीशी गाठ पडेल. कोरियाची जोडी ५७९ गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. तुर्कीए-सर्बिया सुवर्णपदकासाठी लढतील.

याच प्रकारात भारताची अन्य जोडी रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग यांना मात्र छाप पाडता आली नाही. त्यांना ५७६ गुणांसह १०व्या स्थानी समाधानी मानावे लागले. रिदमला एकेरीतही अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. आता ती महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनूसह खेळताना दिसेल.

अर्जुनचे पदक थोडक्यात हुकले

नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या अर्जुन बबुताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने त्याचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. २५ वर्षीय अर्जुनने पात्रता फेरीत २०८.४ गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. अखेरच्या नेममध्ये त्याने ९.५ गुण मिळवले, तर क्रोएशियाच्या मिरान मार्किचने १०.७ गुण कमावत कांस्यपदक मिळवले. कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये अर्जुनने चांगली कामगिरी नोंदवली. दरम्यान, लिहाओ (२५२.२), व्हिक्टर (२५१.४) आणि मार्किच (२३०) यांनी अनुक्रमे तीन पदके जिंकली.

रमिताला सातव्या स्थानी समाधान

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील एकेरी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या रमिता जिंदालला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. तिने १० फेऱ्यांत एकूण १०४ गुण मिळवले. पात्रता फेरीत रमिताने १४५.३ गुणांची कमाई केली होती. मात्र अंतिम फेरीत तिला चमक दाखवता आली नाही.

ट्रॅपमध्ये पृथ्वीराज ३०व्या स्थानी

ट्रॅप प्रकारात भारताचा पृथ्वीराज तोंडाइमन पहिल्या दिवसअखेर ३०व्या स्थानी आहे. ट्रॅपमध्ये प्रत्येकाला ५ फेऱ्यांत २५ वेळा नेम साधण्याची संधी मिळते. यांपैकी १० वेळा नेम साधून झाला असून पृथ्वीराजच्या खात्यात फक्त ६८ गुण आहेत. त्यामुळे अव्वल ६ जणांत स्थान मिळवण्यासाठी मंगळवारी त्याला कामगिरी उंचवावी लागेल.

आजचे वेळापत्रक

-नेमबाजी

कांस्यपदकाची लढत

मनू भाकर आणि सरबजोत सिंग

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक

(दुपारी १ वा.)

ट्रॅप पुरुष एकेरी: दुसरी फेरी

पृथ्वीराज तोंडाइमन

(दुपारी १२.३० वा.)

ट्रॅप महिला एकेरी: पहिली फेरी

श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी

(दुपारी १२.३० वा.)

-रोईंग

पुरुष गट उपांत्यपूर्व फेरी

बलराज पनवार

(दुपारी १.४० वा.)

-हॉकी

पुरुषांचा तिसरा साखळी सामना

भारत वि. आयर्लंड

(सायंकाळी ४.४५ वा.)

-तिरंदाजी

महिला एकेरी पहिली फेरी

अंकिता भकत वि. वायोलेटा

(सायंकाळी ५.१५ वा.)

भजन कौर वि. सैफिया कमल

(सायंकाळी ५.३० वा.)

पुरुष एकेरी पहिली फेरी

धीरज बोमदेवरा वि. ॲडम ली

(रात्री १०.४५ वा.)

-बॅडमिंटन

पुरुष दुहेरी साखळी सामना

सात्विक-चिराग वि. फझर-रियान

(सायंकाळी ५.३० वा.)

महिला दुहेरी साखळी सामना

अश्विनी-तनिषा वि. मापसा-अँजेला

(सायंकाळी ६.३० वा.)

-बॉक्सिंग

पुरुष उपउपांत्यपूर्व फेरी (५१ किलो)

अमित पंघाल वि. पॅट्‌ट्रिक

(सायंकाळी ७.१५ वा.)

महिला पहिली फेरी (५७ किलो)

जास्मिन लंबोरिया वि. नेस्थी

(रात्री ९.२५ वा.)

महिला उपउपांत्यपूर्व फेरी (५४ किलो)

प्रीती पवार वि. मार्सेला

(मध्यरात्री १.२० वा.)

logo
marathi.freepressjournal.in