
ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात होणारी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जवळ येऊन ठेपलेली असतानाच मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर हे राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. बाऊचर यांच्या राजीनाम्याबाबतची माहिती स्वत: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली आहे; परंतु ते टी-२० वर्ल्डकपनंतर पदावरून दूर होणार आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर आता नवा कोच शोधावा लागणार आहे.
क्रिकेट मंडळाने बाऊचर यांचा एक फोटो शेअर करून हेड कोच मार्क बाऊचर हे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. बाऊचर अन्य संधीच्या शोधात आणि भविष्यातील गोष्टींसाठी राजीनामा देत आहेत. क्रिकेट द. आफ्रिकेसाठी ही वाईट बातमी आहे. बोर्ड त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि भविष्यातील योजनेसाठी त्यांना शुभेच्छा देतो.
द.आफ्रिकेचे माजी विकेटकीपर असलेल्या बाऊचर यांनी पदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालका २-१ ने गमावली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्डकपच्या तयारीला लागण्याचे अपेक्षित असतानाच बाऊचर यांनी राजीनामा दिला. द. आफ्रिकेने अद्याप एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही. अशातच आता वर्ल्डकपची तयारी सुरू असताना नवी कोच शोधण्याची वेळ मंडळावर ओढवली आहे.
बाऊचर यांनी डिसेंबर २०१९मध्ये प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाळी संघाने १० कसोटी सामन्यात विजय मिळविला. २३ टी-२० आणि १२ वन-डे सामन्यात विजय मिळविला आहे. या वर्षी दक्षिण आफ्रिकेने भारताचा कसोटी मालिकेत २-१ ने पराभव केला होता. टी-२० वर्ल्डकपच्या आधी दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध तीन टी-२० आणि तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. कोच म्हणून बाऊचर यांचा वर्ल्डकप ही अखेरची स्पर्धा असणार आहे. वर्ल्डकपमध्ये यावेळी भारत, बांगलादेश, पाकिस्तानच्या गटात दक्षिण आफ्रिकादेखील आहे.