
मेलबर्न : अनुभवी फलंदाज मार्नस लबूशेनला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मात्र ११ महिन्यांनी संघात परतला आहे.
भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असून उभय संघांत १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांत २९ ऑक्टोबरपासून ५ टी-२० सामनेही खेळवण्यात येतील. या मालिकेसाठी भारताचा संघ आधीच जाहीर करण्यात आला असून आता ऑस्ट्रेलियाचा संघही घोषित झाला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे दोन्ही मालिकांना मुकणार असल्याने अष्टपैलू व सलामीवीर मिचेल मार्शच कांगारूंच्या संघांचे नेतृत्व करणार आहे. तसेच धोकादायक ग्लेन मॅक्सवेलसुद्धा मनगटाच्या दुखापतीमुळे दोन्ही मालिकांसाठी अनुपलब्ध असेल. ऑस्ट्रेलियाने तूर्तास एकदिवसीय मालिका व पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी संघ जाहीर केले आहेत. उर्वरित तीन टी-२० लढतींसाठी ॲशेसच्या दृष्टीने संघ घोषित केला जाईल.
दरम्यान, लबूशेनला गेल्या १० एकदिवसीय सामन्यांत एकही अर्धशतक साकारता आले नव्हते. त्यामुळे लबूशेनऐवजी यावेळी २९ वर्षीय डावखुरा फलंदाज मॅथ्यू रेनशॉला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्यावर ऑस्ट्रेलियाला मधल्या फळीत तगड्या फलंदाजाची गरज आहे. रेनशॉने नुकताच श्रीलंका-अ संघाविरुद्ध खेळताना शतक साकारून लक्ष वेधले होते.
३५ वर्षीय स्टार्क हा नोव्हेंबरमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. टी-२० प्रकारातून स्टार्कने गेल्या महिन्यात निवृत्ती जाहीर केली. मात्र एकदिवसीय संघातील त्याच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आणखी बळकट होईल. सोबतीला जोश हेझलवूड व ॲडम झाम्पा आहेतच. कमिन्स मात्र जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाठदुखी झाल्यापासून संघाबाहेर आहे, तर मॅक्सवेलला नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे मार्शच आता ऑस्ट्रेलियाच्या टी-२० व एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने नुकताच न्यूझीलंडला टी-२० मालिकेत २-१ असे नमवले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मात्र ऑस्ट्रेलियाचा १-२ असा पराभव झाला होता.
२१ नोव्हेंबरपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांची पाच कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका सुरू होणार आहे. तोपर्यंत प्रमुख खेळाडू तंदुरुस्त व्हावे व सर्व खेळाडूंना पुरेशी विश्रांतीही मिळावी, या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघ निवड केली आहे. कॅमेरून ग्रीन व ॲलेक्स कॅरी यांना फक्त एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा विचार करता ३८ वर्षीय रोहित शर्माकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
-पहिला एकदिवसीय सामना : रविवार, १९ ऑक्टोबर (पर्थ)
-दुसरा एकदिवसीय सामना : गुरुवार, २३ ऑक्टोबर (ॲडलेड)
-तिसरा एकदिवसीय सामना : शनिवार, २५ ऑक्टोबर (सिडनी)
-पहिला टी-२० सामना : बुधवार, २९ ऑक्टोबर (कॅनबरा)
-दुसरा टी-२० सामना : शुक्रवार, ३१ ऑक्टोबर (मेलबर्न)
-तिसरा टी-२० सामना : रविवार, २ नोव्हेंबर (होबार्ट)
-चौथा टी-२० सामना : गुरुवार, ६ नोव्हेंबर (गोल्ड कोस्ट)
-पाचवा टी-२० सामना : शनिवार, ८ नोव्हेंबर (ब्रिस्बेन)
ऑस्ट्रेलियाचे संघ
-एकदिवसीय मालिकेसाठी : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवन, मॅथ्यू शॉर्ट, जोश हेझलवूड, नॅथन एलिस, झेव्हियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, बेन ड्वारशुइस, मॅथ्यू रेनशॉ, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क, कूपर कोनोली.
- दोन टी-२० सामन्यांसाठी : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवन, मॅथ्यू शॉर्ट, जोश हेझलवूड, नॅथन एलिस, झेव्हियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, बेन ड्वारशुइस, टिम डेव्हिड, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू कुन्हेमन, सीन ॲबट.