मेरी कोम ठरली ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द ईयर

लंडन येथे झालेल्या इंग्लंड-भारत वार्षिक पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान
मेरी कोम ठरली ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द ईयर
Published on

लंडन : सर्वाधिक सहा वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी भारताची बॉक्सर मेरी कोमचा गुरुवारी मध्यरात्री लंडन येथे विशेष गौरव करण्यात आला. इंडिया ग्लोबल फोरम (आयजीएफ) इंग्लंड-भारत वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ४० वर्षीय मेरीला ‘ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मेरी ही बॉक्सिंगमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला आहे. तिने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक कमावले होते. त्याशिवाय राज्य सभेची सदस्य असलेल्या मेरी कोमने २० वर्षांच्या कारकीर्दीत एकूण आठ जागतिक पदके (सहा सुवर्ण) मिळवली आहेत. भारताचे इंग्लंडमधील उच्च आयुक्त विक्रम डोराइस्वामी यांच्याहस्ते मेरीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“मेरीने भारतीय क्रीडा सृष्टीसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. बॉक्सिंगच्या माध्यमातून तिने जगभरात भारताची ख्याती पसरवली आहे. मैदानापलीकडेही तिने दिलेल्या योगदानाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ती या पुरस्कारासाठी उत्तम उमेदवार आहे,” असे आयजीएफचे संस्थापक व अध्यक्ष मनोज लाडवा म्हणाले. यंदा या पुरस्कारांचे पाचवे वर्ष होते. उद्योग, व्यावसायिक सेवा, समाज सेवा, सामाजिक प्रभाव आणि विविध बाबींच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

गेली २० वर्षे देशासाठी मिळवलेल्या प्रत्येक पदकाचे हे फळ आहे. कुटुंबापासून दूर राहताना बॉक्सिंगमध्ये स्वत:ची कारकीर्द घडवणे सोपे नव्हते. मात्र असंख्य चांगल्या माणसांच्या सहकार्याने हे शक्य झाले. या पुरस्कारासाठी पात्र समजल्याबद्दल मी संस्थेची आभारी आहे. यापुढेही भारताचे नाव बॉक्सिगंमध्ये आणखी उज्ज्वल करण्यासाठी झटत राहीन.

- मेरी कोम

logo
marathi.freepressjournal.in