T20 Mumbai League : पुरुष-महिला टी-२० मुंबई लीग रंगणार १ जूनपासून

मुंबई क्रिकेट असोसिएशन'ने (एमसीए) टी-२० मुंबई लीगच्या चौथ्या हंगामाची आणि पहिल्या महिला टी-२० मुंबई लीगची घोषणा केली आहे.
T20 Mumbai League : पुरुष-महिला टी-२० मुंबई लीग रंगणार १ जूनपासून
T20 Mumbai League : पुरुष-महिला टी-२० मुंबई लीग रंगणार १ जूनपासून (Photo-X/@T20Mumbai)
Published on

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन'ने (एमसीए) टी-२० मुंबई लीगच्या चौथ्या हंगामाची आणि पहिल्या महिला टी-२० मुंबई लीगची घोषणा केली आहे. या दोन्ही स्पर्धा १ ते १३ जून या कालावधीत वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणार असून मुंबईत क्रिकेटचा मोठा उत्सव रंगणार आहे.

पुरुषांची आणि महिलांची स्पर्धा एकाच वेळी आयोजित केली जाणार आहे. क्रिकेटमधील प्रतिभावान खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या स्पर्धांचे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रक्षेपण केले जाईल, तर जिओ हॉटस्टारवर थेट स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

पुरुषांच्या स्पर्धेत जागतिक स्तरावरील नामवंत क्रिकेटपटूंसह मुंबईतील उदयोन्मुख खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य राहणे, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, मुशीर खान, सुर्यांश शेडगे आणि अभिज्ञान कुंडू या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

टी-२० मुंबई लीगच्या नवीन हंगामाचे आणि पहिल्या वहिल्या टी-२० मुंबई महिला लीगचे काउंटडाऊन आता अधिकच उत्साहात सुरू झाले आहे. यासाठी निमित्त होते ते ट्रॉफी टूरचे, ज्याचा आज अधिकृतरित्या शुभारंभ झाला. या टूरमुळे संपूर्ण शहरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित रस्त्यांपासून ते गजबजलेल्या परिसरांपर्यंत, सर्वत्रच उत्साहाचे आणि उत्कंठेचे वातावरण होते. या चषकाचे स्वागत करण्यासाठी आणि शहरात रंगणाऱ्या या भव्य क्रिकेट महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आनंद साजरा करण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

टी-२० मुंबई लीगचा चौथा हंगाम आणि पहिल्या टी-२० मुंबई महिला लीगचे सामने १ ते १३ जून या कालावधीत, मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. चषक दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी, या चषकाने दक्षिण मुंबईतील वरळी सी-फेस, वरळी स्पोर्ट्स क्लब आणि लालबाग येथील गरमखडा मैदान अशा अनेक प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. या दौऱ्याने उत्साही जनसमुदायाला आकर्षित केलेच पण आगामी स्पर्धांविषयीची उत्सुकता अधिकच वाढवली; यावेळी चाहत्यांनी या चषकाचे जवळून दर्शन घेतले आणि तो अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रे काढली.

दोन आठवडे चालणाऱ्या या चषक दौऱ्यामागची संकल्पना म्हणजे संपूर्ण शहराला सामावून घेणारा एक चाहते-संवाद उपक्रम. यामागील मुख्य उद्देश म्हणजे, लीगभोवती निर्माण झालेला उत्साह केवळ स्टेडियमपुरता मर्यादित न ठेवता, तो मुंबईच्या क्रिकेटप्रेमी समुदायांपर्यंत पोहोचवणे हा आहे. शुक्रवार ते रविवार या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा दौरा संपूर्ण मुंबई शहर, उपनगर आणि लगतच्या भागांमध्ये प्रवास करेल; यामध्ये दादर, वरळी, चर्चगेट, चेंबूर, वांद्रे, विरार, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या विविध ठिकाणांचा समावेश असेल.

logo
marathi.freepressjournal.in