

मुंबई : भारताचा तारांकित फलंदाज रोहित शर्माच्या उपस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शनिवारी रात्री ऐतिहासिक घोषणा केली. एमसीएतर्फे यंदा प्रथमच महिलांच्या टी-२० मुंबई लीगचे आयोजन केले जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये वानखेडे स्टेडियमवर ही लीग रंगणार आहे. तसेच पुरुषांच्या चौथ्या टी-२० मुंबई लीगचे आयोजनही याच कालावधीत केले जाईल.
एमसीएतर्फे २०१८ पासून पुरुषांसाठी टी-२० मुंबई लीग आयोजित केली जायची. २ वर्षे उत्साहात पार पडल्यावर कोरोनामुळे काही वर्षे या लीगमध्ये खंड पडला होता. गेल्या वर्षी भारताचा माजी कर्णधार रोहितला या स्पर्धेचा चेहरा तसेच सदिच्छादूत म्हणून घोषित करण्यात आले. गतवर्षी सिद्धेश लाडच्या नेतृत्वात मराठा रॉयल्स संघाने या स्पर्धेचा तिसरा हंगाम जिंकला.
आता एकीकडे आयपीएल सुरू होण्याचे चाहत्यांना वेध लागलेले असतानाच त्यानंतर टी-२० मुंबई लीगचे पुरुषांचे चौथे पर्व जूनमध्ये रंगणार असल्याचे एमसीएने जाहीर केले. शनिवारी रात्री मुंबईतील ताज लँड्स येथे झालेल्या कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. पुरुषांच्या टी-२० मुंबई लीगमध्ये यावेळी देखील ८ संघ सहभागी असतील. तसेच तीन महिला संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचेही यावेळी प्रथमच आयोजन करण्यात येईल. महिला संघांची नावे काही कालावधीनंतर समजतील.
रोहितच्या उपस्थितीत दोन्ही स्पर्धांच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबईची महिला खेळाडू तसेच भारताचे प्रतिनिधित्व करणारी सायली सतघरे, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, कॅबिनेट मंत्री आणि एमसीए माजी अध्यक्ष आशिष शेलार, लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता, एपेक्स कौन्सिल आणि लीग गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक, तारखा व ठिकाण जाहीर करण्यात येईल.
यावेळी रोहित म्हणाला की, “मुंबई क्रिकेट ज्या पद्धतीने आकार घेत आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. फक्त आयपीएलच नाही तर टी-२० मुंबई लीगने अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी जे केले आहे, ते कौतुकास्पद आहे. टी-२० मुंबईमध्ये खेळणारे अनेक क्रिकेटपटू आता आयपीएलसह राष्ट्रीय संघातही खेळताना आम्ही पाहिले. हे एक मोठे व्यासपीठ आहे. मी गेल्या हंगामाचा भाग होतो. आम्ही पुन्हा हे करत आहोत याचा मला आनंद आहे. एमसीएच्या प्रत्येक सदस्याला ते यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मी श्रेय दिले पाहिजे. या वर्षी, तीन महिला संघ देखील आहेत, म्हणून यंदाचे पर्व आणखी मोठे असेल.”
टी-२० मुंबई महिला लीगचे महत्त्व स्पष्ट करताना सायली सातघरे म्हणाली की, “मुंबई नेहमीच क्रिकेट जगणारे आणि श्वास घेणारे शहर राहिले आहे. आता महिलांसाठीही एक समर्पित व्यासपीठ तयार होत आहे हे पाहणे खूप अर्थपूर्ण आहे. हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल आणि महिला क्रिकेटच्या भविष्यात गुंतवणूक केल्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छिते. टी-२० मुंबई महिला लीग अनेक तरुण मुलींना मोठे स्वप्न पाहण्याची, उच्च पातळीवर स्पर्धा करण्याची आणि त्या देखील एके दिवशी मुंबई आणि भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात असा विश्वास ठेवण्याची संधी देईल.”
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही आपले मत मांडले. “मुंबईचा क्रिकेटचा वारसा नेहमीच एका मजबूत तळागाळातील रचनेवर आणि खेळाडूंना स्वतःला पुढे नेण्यासाठी आणि उच्च ध्येय ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या संस्कृतीवर बांधला गेला आहे. टी-२० मुंबई लीग शहरातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना त्यांच्या क्षमता दाखवण्यासाठी एक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्या तत्वज्ञानाचे प्रतिबिंबित करते. टी-२० मुंबई महिला लीगची सुरुवात आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. महिला क्रिकेट वेगाने वाढत आहे आणि प्रतिभावान खेळाडूंना स्पर्धा करण्यास, विकसित करण्यास आणि खेळाच्या उच्च पातळीवर प्रगती करण्यास अनुमती देणारे मजबूत व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे,” असे नाईक म्हणाले.