मुंबईच्या क्रिकेटपटूंसाठी गुड न्यूज! आता वार्षिक कराराचे 'कवच'; MCA चा ऐतिहासिक निर्णय; खेळाडूंना २० लाखांपर्यंत मानधन मिळणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) खेळाडूंसाठी वार्षिक मानधन करार पद्धत लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. अशाप्रकारची औपचारिक करार पद्धत लागू करणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही भारतातील पहिली राज्य संघटना ठरली आहे.
रणजी स्पर्धेत मुंबईचा संघ
रणजी स्पर्धेत मुंबईचा संघसंग्रहित
Published on

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी खेळाडूंसाठी वार्षिक मानधन करार पद्धत लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. मुंबई क्रिकेटच्या प्रगतीमधील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, उदयोन्मुख क्रिकेटपटूंना यामुळे आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक शिस्त आणि दीर्घकालीन विकासाची संधी मिळणार आहे. अशाप्रकारची औपचारिक करार पद्धत लागू करणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही भारतातील पहिली राज्य संघटना ठरली आहे.

या करार पद्धतीनुसार पात्र खेळाडूंची निवड ही त्यांची वर्षभरातील कामगिरी, तंदुरुस्तीचे निकष आणि निवड समितीच्या शिफारसींनुसार केली जाईल. या करारांतर्गत खेळाडूंची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक १२ ते २० लाख रुपये, ‘ब’ श्रेणीला ८ ते १२ लाख रुपये आणि ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ८ लाख रुपये मानधन दिले जाईल. वार्षिक मानधनाशिवाय खेळाडूंना ‘एमसीए’च्या धोरणानुसार सामना शुल्क, दैनिक भत्ता आणि कामगिरीवर आधारित इतर प्रोत्साहनपर भत्तेही याआधी प्रमाणेच मिळतील.

मुंबईतील क्रिकेटपटूंना आर्थिक स्थैर्य देणे, व्यावसायिक वातावरण निर्माण करणे आणि खेळाडूंमधील कामगिरीचे सातत्य व तंदुरुस्ती टिकवून ठेवणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे भविष्यातील गुणवान खेळाडूंची मोठी फळी तयार होण्यास मदत होणार आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

कराराची मुख्य उद्दिष्टे

-खेळाडूंना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे

-व्यावसायिक क्रीडा वातावरण तयार करणे

-कामगिरीतील सातत्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन

-वरिष्ठ स्तरासाठी गुणवान खेळाडूंची फळी उभारणे

-उदयोन्मुख प्रतिभेला मुंबई क्रिकेटशी जोडून ठेवणे

logo
marathi.freepressjournal.in