एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ANI

न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. त्यांचे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रसुद्धा समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे. मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचे समजते.

ऑक्टोबर २०२२मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचे नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.

अमोल यांनी एमसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मुंबई क्रिकेटच्या हितासाठी असंख्य मोलाचे निर्णय घेतले. त्यांनी मुंबईच्या रणजीपटूंचे सामन्याचे मानधन दुप्पट केले. तसेच रणजी विजेत्या मुंबई संघालाही कोटींच्या घरात रोख पारितोषिक जाहीर केले. नुकताच वांद्रे येथेही ‘होम ऑफ चॅम्पियन्स’ची सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवर पुतळाही त्यांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.

अमोल यांच्याविषयी थोडक्यात

अमोल हे मूळचे नागपूरकर होते. नागपूरच्या अभ्यंकर नगर भागात ते वास्तव्य करत होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. अमोल यांचे वडील किशोर काळे यांचे जे. के. इलेक्ट्रिकल्स हे दुकान होते. व्यवसायाची घडी विस्कटलेली होती. कुटुंब संघपरिवाराशी संबंधित होते. पण ते कधी सक्रिय राजकारणात नव्हते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर ते सक्रिय झाले. वाजपेयींच्या कार्यकाळात राष्ट्रीय विधी आयोगाच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आप्पासाहेब घटाटे यांची नियुक्ती झाली होती. घटाटे हे अमोल यांच्या वडिलांचे स्नेही होते. वाजपेयी सरकारच्या काळातच किशोर काळे यांना वीजक्षेत्रातील अनेक कंत्राटे मिळाली. यातून तोट्यातील व्यवसाय सावरला गेला. पुढे अमोल स्वत: विद्युत अभियंता असल्याने त्यांनी याच व्यवसायात पाऊल ठेवले होते. क्रिकेटमध्ये रस असल्याने मग ते या खेळाशी निगडित संघटनेकडे वळले.

logo
marathi.freepressjournal.in