
ध्यानधारणेमुळे तणाव हलका होत असल्याने मी अनेक दिवसांपासून ध्यानधारणा करीत आली आहे, असे भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने सांगितले. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतून सिंधूने माघार घेतली आहे.
कान्हा शांती वनम येथे आयोजित तीन दिवशीय ‘इंटरनॅशनल रायझिंग वुईथ काइंडनेस यूथ समिट’च्या सांगता कार्यक्रमात आभासी सहभागाद्वारे सिंधूने सांगितले की, युवकांनी ध्यानधारणेची सवय लावून घेतली पाहिजे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर प्रथमच सिंधूने जाहीर कार्यक्रमात सिंधू सहभागी झाली. सिंधूने सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझ्या आशा उंचावल्या होता; मात्र दुर्दैवाने पायाच्या दुखापतीमुळे मला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीपासूनच पायाला वेदना जाणवत होत्या. हैदराबादला परतल्यावर तातडीने ‘एमआरआय’ चाचणी करून घेतली. त्यात डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले.
सिंधूने ट्विटरच्या माध्यमातून पायाच्या दुखापतीमुळे जागतिक स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती दिली. सिंधूने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली होती.