२४, २५ नोव्हेंबर रोजी रंगणार आयपीएलचे मेगा ऑक्शन; जेद्दा येथे होणाऱ्या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल १,५७४ खेळाडूंची नोंदणी

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ मध्ये होणाऱ्या १८ व्या हंगामासाठी २४ व २५ नोव्हेंबर रोजी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया म्हणजेच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दा या शहरात होणाऱ्या या लिलावासाठी तब्बल १,५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
२४, २५ नोव्हेंबर रोजी रंगणार आयपीएलचे मेगा ऑक्शन; जेद्दा येथे होणाऱ्या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल १,५७४ खेळाडूंची नोंदणी
Published on

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५मध्ये होणाऱ्या १८व्या हंगामासाठी २४ व २५ नोव्हेंबर रोजी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया म्हणजेच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दा या शहरात होणाऱ्या या लिलावासाठी तब्बल १,५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र त्यांपैकी २०४ जणांनाच खरेदी केले जाणार आहे. २०२५ ते २०२७ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी यंदाचे मेगा ऑक्शन होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे २०२५मध्येही एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या मनोरंजनाचा हंगाम रंगणार आहे. त्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबरच्या काळात खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होते. त्यातच यावेळी मेगा-ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक संघाला ५ खेळाडू संघात कायम राखण्याची व अन्य एका खेळाडूसाठी ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरण्याची मुभा देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपल्यावर सर्व १० संघांनी आपापल्या संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानंतर आता आयपीएलच्या प्रशासकीय समितीने लिलावाची तारीखही घोषित केली आहे. यापूर्वी २०२४मध्येही आयपीएलचे ऑक्शन भारताबाहेर दुबई येथे आयोजित करण्यात आले होते.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आयपीएलसाठी १,५७४ खेळाडूंनी त्यांचे नाव नोंदवले आहे. यामध्ये १,१६५ भारतीय व ४०९ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच विदेशी खेळाडूंचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक ९१ खेळाडू यंदा लिलावात सहभागी होतील. त्यानंतर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (७६), इंग्लंड (५२), न्यूझीलंड (३३), वेस्ट इंडिज (३३) यांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तान व श्रीलंकेचे प्रत्येकी २९ खेळाडू लिलावाचा भाग असतील.

प्रत्येक संघाला किमान २० ते कमाल २५ खेळाडू खरेदी करणे गरजेचे आहे. बहुतांश संघांनी ५ ते ६ खेळाडू संघात कायम राखले आहेत. तर पंजाब किंग्जने सर्वात कमी म्हणजे फक्त २ खेळाडूंना संघात रिटेन केले आहे. त्यामुळे १,५७४ खेळाडूंपैकी फक्त २०४ खेळाडूंनाच आयपीएलमध्ये संधी मिळणार आहे, तर उर्वरित खेळाडूंना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रत्येक संघाला लिलावासाठी १२० कोटी देण्यात आले होते. त्यांपैकी कायम राखलेल्या खेळाडूंची किंमत वजा केल्यावर उर्वरित खेळाडूंसह त्यांना लिलावात संघबांधणी करावी लागेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केले.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे पहिली कसोटी होणार आहे. त्या मालिकेदरम्यानच जेद्दा येथे खेळाडूंची लिलाव प्रकिया होणार आहे. त्यामुळे चाहत्यांनासुद्धा मनोरंजनाची दुहेरी पर्वणी मिळणार आहे.

गत‌वर्षी कोलकाताला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर यंदा लिलावात दिसेल. तसेच दिल्लीने ऋषभ पंतला, तर लखनऊने के. एल. राहुलला संघातून काढले आहे. मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट असे गोलंदाज व जोस बटलर, क्विंटन डीकॉक असे फलंदाज यावेळी लिलावाच्या रिंगणात उतरणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in