लंडन : अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची फुटबॉल विश्वातील मक्तेदारी संपुष्टात आल्याचे संकेत गुरुवारी मिळाले. फुटबॉलमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन लाभलेल्या ३० खेळाडूंच्या यादीतून मेस्सी आणि रोनाल्डोला यंदा वगळण्यात आले आहे. मुख्य म्हणजे गेल्या २१ वर्षांत म्हणजेच २००३नंतर प्रथमच या दोघांपैकी एकही खेळाडू या पुरस्कारासाठी शर्यतीत नसेल.
२८ ऑक्टोबर रोजी यंदाचा बॅलन डी’ओर पुरस्कार सोहळा रंगणार असून त्यासाठी युरोपियन फुटबॉल महासंघाने गुरुवारी ३० नामांकनाची नावे जाहीर केली. फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या वतीने १९५६पासून वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला हा पुरस्कार देण्यात येतो. ३७ वर्षीय मेस्सीने गेल्या वर्षी हा पुरस्कार जिंकला होता. तसेच प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने विक्रमी ८ वेळा हा पुरस्कार उंचावला आहे.
मात्र १ ऑगस्ट, २०२३ ते ३१ जुलै, २०२४ या काळातील कामगिरीच्या आढाव्यानुसार मेस्सी आंतरराष्ट्रीय तसेच क्लब पातळीवरील स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने त्याला यंदा पुरस्काराच्या शर्यतीतून वगळण्यात आले आहे. अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली असली, तरी यावेळी मेस्सीने त्यामध्ये फारसे योगदान दिले नाही. मेस्सी सध्या अमेरिकेतील इंटर मियामी संघाकडून खेळतो.
दुसरीकडे ३९ वर्षीय रोनाल्डोने ५ वेळा हा पुरस्कार पटकावला होता. मात्र त्याच्या कामगिरीतसुद्धा गेल्या वर्षभरात घसरण झाल्याने रोनाल्डोही यावेळी पुरस्कार जिंकू शकणार नाही. रोनाल्डो सध्या सौदी लीगमधील अल-नासर क्लबचे प्रतिनिधित्व करतो. ला लिगा, प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग यांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांपासून हे दोघेही खेळाडू सध्या दूर आहेत.
रेयाल माद्रिदला चॅम्पियन्स लीग जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे व्हिनिशियस ज्युनियर, जूड बेलिंघम तसेच युरो चषक विजेत्या स्पेनचा रॉड्री, इंग्लंडचा हॅरी केन, एर्लिंग हालँड आणि फ्रान्सचा प्रतिभावान किलियान एम्बाप्पे यांना यंदा नामांकन लाभले आहे. त्यामुळे आता यांच्यापैकी कोण बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.
हे माहीत आहे का?
२००४मध्ये रोनाल्डोला प्रथम नामांकन लाभले. तर मेस्सीला २००६पासून सातत्याने नामांकन लाभत आहे.
मेस्सीने २००९मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकल्यावर सलग चार वर्षे बाजी मारली. तर रोनाल्डोने २००४मध्येच हा पुरस्कार प्रथम पटकावला होता.
२००८पासून गेल्या १६ वर्षांत १३ वेळा मेस्सी अथवा रोनाल्डोनेच हा पुरस्कार जिंकलेला आहे. मात्र आता युरोपियन क्लबशी निगडित स्पर्धांपासून दूर गेल्यामुळे त्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आलेला नाही.