FIFA World Cup 2026 : मेक्सिकन वेवद्वारे फिफाचा शुभारंभ; विश्वचषकाच्या सलामीला सहयजमान मेक्सिकोचे दक्षिण आफ्रिकेवर २-० असे वर्चस्व

क्रीडा विश्वातील सर्वात मोठा सोहळा मानल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा गुरुवारी मध्यरात्री धडाक्यात शुभारंभ झाला.
FIFA World Cup 2026 : मेक्सिकन वेवद्वारे फिफाचा शुभारंभ; विश्वचषकाच्या सलामीला सहयजमान मेक्सिकोचे दक्षिण आफ्रिकेवर २-० असे वर्चस्व
FIFA World Cup 2026 : मेक्सिकन वेवद्वारे फिफाचा शुभारंभ; विश्वचषकाच्या सलामीला सहयजमान मेक्सिकोचे दक्षिण आफ्रिकेवर २-० असे वर्चस्व
Published on

मेक्सिको सिटी : क्रीडा विश्वातील सर्वात मोठा सोहळा मानल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा गुरुवारी मध्यरात्री धडाक्यात शुभारंभ झाला. अ-गटातील लढतीत सहयजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव केल्याने चाहत्यांना मेक्सिकन वेव पाहायला मिळाली. ज्युलियन क्विनोनेझ (९वे मिनिट) आणि राऊल हिमेनेझ (६७वे मिनिट) यांनी केलेल्या गोलच्या बळावर मेक्सिकोने बाजी मारली. या लढतीत तीन लाल कार्डही देण्यात आल्याने सामना चांगलाच रंगला.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला. क्रीडा विश्वातील सर्वात मोठा सोहळा मानल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वचषकासाठी गुरुवार मध्यरात्रीपासून ४८ संघांत चढाओढ सुरू झाली. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी पुढील महिनाभर फिफाच्या फिव्हरमध्ये न्हाऊन निघतील.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगणार आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. १९३०मध्ये पहिला विश्वचषक पार पडला. तेव्हापासून आजवर कधीच सहभागी संघांची सख्या ३२च्या पुढे गेली नव्हती. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे.

अ-गटातील सलामीच्या लढतीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. घरच्या मैदानावरील आयकॉनिक अझ्टेका स्टेडियमवर ८०,८२४ प्रेक्षकांच्या अलोट गर्दीसमोर मेक्सिकोने आफ्रिकेवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. चार वर्षांपूर्वी कतारमधील विश्वचषकात गट साखळीतूनच बाहेर पडणाऱ्या मेक्सिकन संघाने या विजयासह जोरदार पुनरागमन केले आहे. मेक्सिकोने त्यांच्या इतिहासात दोनदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी यजमान देश असतानाच (१९७० आणि १९८६) ही कामगिरी केली होती.

सामन्याच्या नवव्या मिनिटाला क्विनोनेझने गोल करून मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६६ व्या मिनिटाला हिमेनेझने हेडरद्वारे दुसरा गोल करत संघाचा विजय निश्चित केला. हिमेनेझचा तीन विश्वचषक स्पर्धांमधील हा पहिलाच गोल असून मेक्सिकोसाठी हा त्याचा ४६वा गोल ठरला. या गोलसह जिमेनेझने मेक्सिकोच्या राष्ट्रीय संघासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत जॅरेड बोरगेटीसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे.

या विजयानंतर मेक्सिकोने गटात अग्रस्थान मिळवले आहे. दुसरा सामना जिंकणारा कोरिया ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. कारण त्यांचा गोलफरक मेक्सिकोच्या तुलनेत कमी आहे. पुढील गुरुवारी मेक्सिको व कोरिया आमनेसामने येतील. त्याच दिवशी आफ्रिका व चेक प्रजासत्ताक दोन हात करतील.

दरम्यान, यंदा उष्ण वातावरणामुळे प्रत्येक लढतीत दोन वेळा पाणी पिण्यासाठी ३ मिनिटांची विश्रांती घेतली जाणार आहे. पहिल्या सत्रात २२व्या, तर दुसऱ्या सत्रात ६७व्या मिनिटाला विश्रांती घेतली जात आहे.

गोलफलक

  • मेक्सिको (२) - द. आफ्रिका (०)

  • क्विनोनेझ (९ मि)

  • हिमेनेझ (६७ मि)

दक्षिण कोरियाची पिछाडीवरून सरशी

ग्वादालाजरा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकाचा २-१ असा पराभव केला. दक्षिण कोरियाच्या या विजयात हाँग इन-बेओम याने एक गोल केला आणि दुसऱ्या गोलसाठी महत्त्वपूर्ण मदत केली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. कोरियाने गोल करण्याची संधी अनेकदा गमावली. तर चेकचा संघ बचाव करताना आढळला. त्यामुळे प्रेक्षकांनी काही काळासाठी दोन्ही संघांची हुर्योही उडवली. अखेरीस दुसऱ्या सत्रात ५९व्या मिनिटाला चेक प्रजासत्ताकाच्या संघाने सामन्यात आघाडी घेतली. पेनल्टी क्षेत्रात मिळालेल्या एका लांब थ्रो-इनवर कर्णधार लॅडिस्लाव्ह क्रेजची याने हेडरद्वारे गोल करून आपल्या संघाला १-० असे पुढे नेले.

मात्र दक्षिण कोरियाने ६७व्या मिनिटाला सामन्यात बरोबरी साधली. हाँग याने चेक प्रजासत्ताकाच्या दोन खेळाडूंना चकवून उत्कृष्ट मैदानी हालचालींसह गोल केला. त्यानंतर ८०व्या मिनिटाला हाँगने उजव्या बाजूने दिलेल्या क्रॉस पासवर ओह ह्यून-ग्यु याने निर्णायक गोल करून दक्षिण कोरियाचा विजय सुनिश्चित केला. ग्वादालाजारा स्टेडियमवरील हा सामना पाहण्यासाठी अनेक जागा रिकाम्या होत्या. ४५,६६४ आसनक्षमता असलेल्या ग्वादालाजारा स्टेडियमवर या सामन्यासाठी ४४,९८५ प्रेक्षकांची उपस्थिती घोषित करण्यात आली होती.

चेक प्रजासत्ताकचा संघ २००६ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. फिफा क्रमवारीत २५ व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाला ३८व्या स्थानावरील चेक प्रजासत्ताकविरुद्ध सुरुवातीला अनेक चांगल्या संधी मिळाल्या होत्या, मात्र त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अखेरीस दुसऱ्या सत्रात त्यांनी कामगिरीत सुधारणा केली.

गोलफलक

  • दक्षिण कोरिया (२) - चेक प्रजासत्ताक (१)

  • हाँग बेओम (६७) - लॅडिस्लाव्ह क्रेझ (५९वे मिनिट)

  • ह्यून ग्यू (८०)

तीन जणांना रेड कार्ड

सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू स्पेफेलो सिथोले आणि थेम्बा झ्वानी या दोघांना रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाला केवळ नऊ खेळाडूंसह सामना खेळावा लागला. त्यानंतर भरपाईच्या वेळेत (इंज्युरी टाईम) मेक्सिकोचा बचावपटू सीझर मॉन्टेसलाही रेड कार्ड देण्यात आले. विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात तीन रेड कार्ड देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. तसेच २००६ च्या विश्वचषकात पोर्तुगाल-नेदरलँड्स यांच्यातील सामन्यानंतर (चार रेड कार्ड) कोणत्याही एका सामन्यातील ही सर्वाधिक रेड कार्डची संख्या ठरली.

आजचे सामने

  • अमेरिका वि. पॅराग्वे (सकाळी ६.३० वाजता)

  • स्वित्झर्लंड वि. कतार (रात्री १२.३० वाजता)

  • ब्राझील वि. मोरोक्को मध्यरात्री ३.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स

logo
marathi.freepressjournal.in