IPL 2026 : मुंबई रोखणार पंजाबचा विजयरथ? वानखेडेवर आज उभय संघ आमनेसामने; रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम

तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करत आलेली नाही. चारपैकी तीन लढती गमावल्यामुळे मुंबईवर दडपण वाढत असून अशातच त्यांची गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर अपराजित पंजाब किंग्जशी गाठ पडणार आहे.
पंजाबचा विजयरथ मुंबई रोखणार? वानखेडेवर आज उभय संघ आमनेसामने; रोहितच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम
पंजाबचा विजयरथ मुंबई रोखणार? वानखेडेवर आज उभय संघ आमनेसामने; रोहितच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम(X)
Published on

मुंबई : तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करत आलेली नाही. चारपैकी तीन लढती गमावल्यामुळे मुंबईवर दडपण वाढत असून अशातच त्यांची गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर अपराजित पंजाब किंग्जशी गाठ पडणार आहे. त्यामुळे मुंबईचा विजयरथ पंजाब रोखणार का, याकडे लक्ष असेल. अनुभवी रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत मात्र अद्याप संभ्रम कायम आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने हंगामाची सुरुवात विजयासह करताना कोलकाताला नमवले. मात्र त्यानंतर अनुक्रमे दिल्ली, राजस्थान व बंगळुरूकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. तसेच गेल्या लढतीत रोहितच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. त्याच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, रोहितसंबंधीचा निर्णय गुरुवारी सामन्यापूर्वीच घेतला जाईल, असे सांगण्यात आले. बुधवारी रोहित नेटमध्ये सराव करताना दिसला. तसेच त्याने धावण्यावर भर दिला.

दुसरीकडे मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने चारपैकी ३ लढती जिंकल्या आहेत, तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पंजाबचा संघ अव्वल चार संघांत स्थान टिकवून आहे. गतवर्षी पंजाबला जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. यंदा हा संघ वेगळ्याच जोशात दिसत आहे. तसेच अंतिम ११ खेळाडूंत पंजाबचा संघ ४ ते ५ आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या खेळाडूंना (अनकॅप्ड) संधी देत आहे. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस, शशांक सिंग असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंग अपयशी ठरत असला, तरी मार्को यान्सेन, युझवेंद्र चहल सातत्याने छाप पाडत आहेत.

तिलकवर दडपण, बुमराकडून अपेक्षा

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा टिच्चून मारा करत असला तरी त्याला चार लढतींमध्ये अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही. त्यामुळे गुरुवारी तरी बुमरासह मुंबईच्या अन्य गोलंदाजांना सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ट्रेंट बोल्ट, मयांक मार्कंडे, हार्दिक या सर्वांनीच अद्याप मार खाल्ला आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर व मिचेल सँटनर यांच्यावरच गोलंदाजीची भिस्त आहे. बुमराला लय मिळाली, तर आपोआप संघ लयीत येईल. त्याचप्रमाणे फलंदाजीत तिलक वर्माने पूर्ण निराशा केली आहे. तिलकच्या फलंदाजी क्रमाविषयीदेखील सातत्याने चर्चा सुरू आहे. रोहित अनुपलब्ध असल्यास दानिश मलेवार किंवा नमन धीरला सलामीला पाठवण्याचा पर्याय मुंबईपुढे आहे. शर्फेन रुदरफोर्ड मुंबईसाठी यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. बंगळुरूविरुद्ध त्याने ९ षटकारांसह अर्धशतक साकारले. सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन यांनी जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. कागदावर मुंबईचा संघ तुल्यबळ दिसत असला, तरी मैदानात त्यांच्याकडून सांघिक कामगिरी अद्याप झालेली नाही.

उभय संघांत आतापर्यंत ३४ सामने झाले आहेत. त्यांपैकी मुंबईने १७, तर पंजाबनेदेखील १७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांतील लढती अटीतटीच्या झाल्या आहेत. आता गुरुवारी यामध्ये कोण आघाडी घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

विल जॅक्सचे काय?

इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स अद्याप भारतात दाखल झालेला नाही. बुधवारीदेखील जॅक्सविषयी विचारण्यात आल्यावर तो लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होईल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले. त्यामुळे जॅक्सची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

खेळपट्टीचा अंदाज

या लढतीसाठी काहीशी संथ स्वरुपाची खेळपट्टी वापरण्यात येणार असल्याचे समजते. मात्र वानखेडेवर दव नेहमीच येत असल्याने शक्यतो नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यालाच प्राधान्य देतो. लढतीवर पावसाचे सावट नसले तरी उष्णतेमुळे खेळाडूंचा कस लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

आयपीएल गुणतालिका

(चेन्नई वि. कोलकाता सामन्यापर्यंत)

logo
marathi.freepressjournal.in