

मुंबई : मुंबई इंडियन्सने घरच्या वानखेडे स्टेडियमवर सलामीच्या लढतीत गुणांचे खाते उघडल्यानंतर खराब कामगिरीमुळे मुंबईची तळाच्या आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता तब्बल दोन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा मुंबईचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून यावेळी तरी पाच वेळच्या विजेत्यांना सूर गवसणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र मुंबई इंडियन्सची गाठ गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी पडणार असल्यामुळे त्यांच्यासाठी हे आव्हान सोपे असणार नाही.
जवळपास १३ मोसमांचा दुष्काळ संपवत मुंबईने 'पहिला सामना देवाला' न देता विजय प्राप्त केला. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवत गुणांची कमाई केली. त्यानंतर मात्र मुंबईला विजयी घोडदौड कायम राखता आली नाही. लागोपाठच्या दोन सामन्यांत दारुण पराभव पत्करल्यामुळे खराब रनरेटसह मुंबईची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
फलंदाजी ही मुंबई इंडियन्ससाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोहित शर्मा आणि रायन रिकेटलनचा अपवाद वगळता मुंबईचे सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्यांच्यासमोर तगड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे.
विराट कोहलीच्या फॉर्ममुळे या सामन्यात बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास, मुंबईला सांघिक कामगिरीवर भर द्यावा लागेल.
मुंबईकडून रोहित शर्माने ३ सामन्यांत सर्वाधिक ११८ धावा केल्या असल्या तरी मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी हा मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव आपल्या कर्तृत्वाला साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. सूर्यकुमारने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध महत्त्वाचे अर्धशतक झळकावले, मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याला छाप पाडता आली नाही. कर्णधार हार्दिक पंड्यालाही यंदाच्या आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी करता आलेली नाही. पावसाने व्यत्यय आणलेल्या गुवाहाटीतील सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली, त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांना मैदानावर टिकाव धरता आला नाही. जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत असतानाही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी पॉवरप्लेच्या ३.२ षटकांत ५९ धावा वसूल केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही शुक्रवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या फलंदाजीमुळे राजस्थानने बंगळुरूचे २०१ धावांचे लक्ष्य सहज पार केले. बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदार (१४२ धावा), विराट कोहली (१२९ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (१२५ धावा) हे तिघेही तुफान फॉर्मात असल्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर धावांची बरसात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टिम डेव्हिड (९९ धावा), रोमारियो शेफर्ड आणि व्यंकटेश अय्यर हे अव्वल दर्जाचे फिनिशर त्यांच्याकडे आहेत. कोहली फलंदाजीत सातत्य दाखवत असतानाही फिल सॉल्टला चांगली सुरुवात करता आलेली नाही. आता गोलंदाजीत जोश हेझलवूडचे आगमन झाल्यामुळे बंगळुरूची गोलंदाजी तगडी झाली आहे. भुवनेश्वर कुमार नव्या चेंडूवर आपली कमाल दाखवत आहे.
जवळपास १५ वर्षे मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहित शर्माला अजून एकदा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. संघाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे.
विराट कोहली सध्या आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. आतापर्यंत ३ सामन्यांत त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत.
बेंगळुरू गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असून २० विकेट्सपैकी १५ विकेट्स त्यांनी मिळवल्या आहेत. संघाच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
१५ व्या वर्षपूर्तीनिमित्त पोलार्डकडून रोहितची स्तुती
मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड याने मुंबई संघाकडून १५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल माजी कर्णधार रोहित शर्माची स्तुती केली. रोहितची मेहनत, खेळाप्रतीची बांधिलकी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. १५ वर्षांच्या कारकीर्दीत रोहितने मुंबईला अनेक वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे, असे पोलार्डने सांगितले. २००८ ते २०१० या कालावधीत डेक्कन चार्जर्सकडून खेळल्यानंतर तत्कालिन कर्णधार सचिन तेंडुलकरच्या मध्यस्थीमुळे रोहित शर्मा २०११ साली मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. १० एप्रिल २०११ रोजी मुंबईकडून दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पदार्पण केल्यानंतर रोहित आजतागायत मुंबई इंडियन्सचा भाग आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघु शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा, यश दयाल.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून