मध्यम मार्ग

तेव्हा त्रयस्थ ठिकाणीच उभय देशांतील सामना व्यवहार्य ठरेल, याची जाणीव सर्वच संबंधितांनी ठेवणे जरुरीचे आहे.
मध्यम मार्ग

आगामी आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे; तर वन-डे विश्वचषक २०२४ चे यजमानपद भारताकडे आहे. तेव्हा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये नियोजित असली, तरी ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणीच होईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी ठामपणे सांगितल्यानंतर मोठा गहजब उडाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) अक्षरशः तीळपापडच झाला आहे, म्हणा ना! त्रयस्थ ठिकाणी आयोजन हा पाकिस्तानवर अन्याय असल्याचे एक वेळ मान्य केले, तरी खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याकडे पीसीबीने पाहायला हवे, खचितच.

समजा, खेळात राजकारणाची भेसळ न करता भारत सरकारने उदार आणि उदात्त भावनेतून टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची मुभा दिलीच, तर भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेची हमी कोण देणार? श्रीलंकेच्या संघावर लाहोरमधील गडाफी स्टेडियमजवळ ३ मार्च २००९ रोजी झालेला अतिरेकी हल्ला कोणाला विसरता येईल? सुरक्षेत किंचितही ढिलाई झाली, तरी जगभरातून तोंड दाबून होणारा बुक्क्यांचा मार पाकिस्तानला सहन करावा लागेल, त्याचे काय? जरी सुरक्षा व्यवस्था कडक केल्याची ग्वाही यंत्रणांनी दिली, तरी हुल्लडबाज प्रेक्षकांचे काय? सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर 'सीमेपलीकडून' प्रेक्षकांनी कागदाचे कपटे, रिकाम्या बाटल्या यांचा क्षेपणास्त्रांसारखा वापर केल्यास जबाबदार कोण? याची जबाबदारी घेण्यास पीसीबी तयार आहे का? तेव्हा त्रयस्थ ठिकाणीच उभय देशांतील सामना व्यवहार्य ठरेल, याची जाणीव सर्वच संबंधितांनी ठेवणे जरुरीचे आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून भारताचे गृह मंत्रालय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठविण्याबाबतचा निर्णय घेईल, हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले, ते म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहे. ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले की, ‘‘पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत गृह मंत्रालय पुढील वर्षीच योग्य तो निर्णय घेईल.’’ मध्य प्रदेशात नियोजित ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या घोषणेसाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान ठाकूर म्हणाले की, ‘‘भारताचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. भारताचे विशेषतः क्रिकेटमध्ये असलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही.’’ अनुराग यांच्या या विधानामुळे खरेतर पाकिस्तान्यांचा राग शांत व्हायला हवा. भारताची क्रिकेटमधील ही ‘दादागिरी’ तर चक्क पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही कधीकाळी मान्य केली होती. भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट संपेल, असे विधान त्यांनी केले होते. असे असतानाही पीसीबीने पुढील वर्षी भारतात नियोजित वन-डे वर्ल्डकपमधून माघार घेण्याची धमकी का बरे द्यावी?

रमीझ राजा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यात राजा यांनी असे म्हटलेले दिसते की, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) भारतातून सर्वाधिक महसूल मिळतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या निधीवर ५० टक्के खर्च भागविते. आयसीसी स्पर्धांचे आयोजन करते आणि त्यातून मिळणारा पैसा सदस्य देशांमध्ये वितरीत करते. आयसीसीला ९० टक्के निधी भारतीय मार्केटमधून येतो. भारतीय बिझनेस हाऊसेसमुळेच पाकिस्तानी क्रिकेटचे अस्तित्व आहे. अशा स्थितीत पाकिस्तान क्रिकेट भारताच्या पाठिंब्याशिवाय तग धरूच शकत नाही.’’ आता बोला! एवढी सारी तेव्हाची समज मग आताच कुठे गेली?

राजासाब असेही म्हणाले होते की, ‘‘जर भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला निधी मिळू न देण्याचे मनात आणले, तर पीसीबी संपुष्टातही येऊ शकते.’’ मग एवढे अगाध ‘ज्ञान’ असताना राजाने पेडगावला का बरे जावे? खेळात राजकारण आणू नये, अशी भूमिका एक माजी क्रिकेटपटू म्हणून ज्या विद्यमान पीसीबी अध्यक्षांकडून आणि प्रदीर्घकाळ भारतात व्यतीत केलेल्या जाणकार समालोचकाकडून अपेक्षित आहे, त्यांनीच भारतातील वन-डे विश्वचषकात न खेळण्याचा असा टोकाचा राजकीय आणि सवंग पवित्रा घ्यावा? शेवटी, 'नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे...' हेच खरे!

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडियाने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला, हे वास्तविक योग्यच झाले. शेवटी पैशापेक्षाही खेळाडूंची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जय शहा यांच्या वक्तव्यानंतर पीसीबीने तातडीने बैठक आयोजित करण्याचे साकडे आशिया क्रिकेट परिषदेला (एसीसी) घातले. पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुढील महिन्यात मेलबर्न येथे होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत भारताच्या भूमिकेविरुद्ध आवाज उठविला जाईल.

परंतु, असे आवाज उठवित आव्हान देण्याने काय मूळ दहशतवादाचा मुद्दा झाकोळला जाणार आहे? भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता. २००८ मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेले क्रिकेट संबंध तोडले. तेव्हापासून दोन्ही संघ त्रयस्थ ठिकाणी खेळत आहेत. द्विपक्षीय मालिका टाळून केवळ आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. उभय देशांत शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती. आता सौजन्य भावना आणि सुरक्षिततेचा दृष्टिकोन यातून प्रस्तावित केलेल्या त्रयस्थ ठिकाणाच्या कल्पनेलाही कडाडून विरोध केला जात आहे. यातही पुन्हा दहशतवादच ना!

पुढील वर्षी भारतात नियोजित विश्वचषक स्पर्धेत सहभागी न होण्याचा ‘आत्मघातकी’ पवित्राच पीसीबी घेत आहे जणू. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू याला अनुमोदन देत आहेत. एकेकाळचे खेळाडू असलेले हे दिग्गजही खेळाडूंच्या सुरक्षेबाबत इतके कसे असंवेदनशील? थेट बहिष्काराची भाषा करण्याऐवजी भारतातील वन-डे वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामनाही तटस्थ ठिकाणी व्हावा, असे तरी पीसीबी किंवा माजी दिग्गज यांनी म्हणावे ना!

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू युनूस खान एका न्यूज चॅनेलवर म्हणाला की, ‘‘मी पीसीबीला कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करेन. तसेच जर बीसीसीआय त्यांच्या निर्णयावर ठाम असेल, तर पीसीबीलाही ताठर राहावे लागेल. जर भारतीय संघ आशिया कप खेळला नाही, तर पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्ताननेही भारतात जाऊ नये. तटस्थ ठिकाणी आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यास जोरदार विरोध करावा.’’

या खडूस वक्तव्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू कामरान अकमलने तर कमालच केली. अकमल म्हणाला, ‘‘आशिया कप पाकिस्तानातच व्हायला हवा आणि तसे न झाल्यास पाकिस्तानने भारताविरुद्ध कुठेही सामना खेळू नये. मग ती आयसीसी स्पर्धा असो की आशिया चषक स्पर्धा.’’ कामरानच्या या वक्तव्यात तसा तार्किक दम आहे, खरोखरच. जर खेळायचेच नसेल तर अपवाद कशासाठी? एकदम बरोब्बर! पण मग भारताकडून आयसीसीला ९० टक्के निधी कसा मिळणार आणि पाकिस्तानी क्रिकेट कसे जगणार? तेव्हा मुद्दा यजमानपदाचा किंवा त्रयस्थ ठिकाणच्या आयोजनाचा नसून खेळाडूंच्या सुरक्षेचा आहे, हे या साऱ्या आक्रसताळ्यांना ठणकावून सांगितलेच पाहिजे. त्याचबरोबर उभय बाजूंनी टोकाची भूमिका घेण्याऐवजी मध्यम मार्गी तोडगाही शोधून काढला पाहिजे. यजमानपद कोणीही भूषविले, तरी अपवाद म्हणून उभय देशांतील एखाद-दुसरा सामना यजमान राष्ट्राच्या शेजारच्या देशात नियोजित करण्याचा पर्यायही आजमावून पाहता येऊ शकेल. संयुक्त यजमानपद असताना असे नियोजन होतच असते ना! यामुळे यजमानपदही मिरवता येईल आणि खेळाडूंची सुरक्षाही राखता येईल. तेव्हा सवंग विधाने करून वातावरण गरमागरम करण्यापेक्षा टेबलावर गरमागरम चहाचा घोट घेत मध्यम मार्ग निवडणेच उभय देशांच्या हिताचे ठरेल, खचितच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असा वादावादीचा उपद‌्व्याप आतापासूनच कशासाठी? आधी ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकपचे काय ते बघा ना, वादावर तात्पुरता मध्यममार्गी तोडगा म्हणून तरी!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in