मिडलाईन स्पोर्ट्स, श्रीराम, गोल्फादेवी बाद फेरीत; राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय स्पोर्ट्स क्लब, बंड्या मारुती संघाचीही आगेकूच

मिडलाईन स्पोर्ट्स, श्रीराम कबड्डी संघ, ओम् पिंपळेश्वर, गोल्फादेवी यांनी अमरहिंद मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरी गाठली.
मिडलाईन स्पोर्ट्स, श्रीराम, गोल्फादेवी बाद फेरीत; राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय स्पोर्ट्स क्लब, बंड्या मारुती संघाचीही आगेकूच

मुंबई : मिडलाईन स्पोर्ट्स, श्रीराम कबड्डी संघ, ओम् पिंपळेश्वर, गोल्फादेवी यांनी अमरहिंद मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरी गाठली. तसेच अंकुर स्पोर्ट्स विजय क्लब, गोलफादेवी, बाबुराव चांदेरे, विजय स्पोर्ट्स क्लब, बंड्या मारुती, लायन्स स्पोर्ट्स हे संघदेखील बाद फेरीत दाखल झाले.

दादर, गोखले रोड येथील मंडळाच्या पटांगणातील मॅटवर सुरू असलेल्या स्व. उमेश शेणॉय स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेच्या ई गटात पालघरच्या श्रीराम संघाने उपनगराच्या ओवळी मंडळावर ४१-३५ अशी मात केली. श्रीरामकडून प्रतीक जाधवने १८ गुण मिळवित विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मिडलाईनने अ गटात जय दत्तगुरूला ३०-२२ असे पराभूत केले. त्यांच्या धीरज बैलमारेने २२ चढायात ६ गुण घेतले. त्याला वैभव मोरेने ४ पकडी करीत छान साथ दिली.

उपनगराच्या चेंबूर क्रीडा केंद्राने ब गटात मुंबईच्या ओम पिंपळेश्वरचा ६०-२९ असा फडशा पाडला. पण गुण फरकाच्या नियमानुसार त्यांना साखळीतच गारद व्हावे लागले. चांदेरे फाऊंडेशन बरोबर मोठ्या फरकाने पराभूत झाल्याचा फटका त्यांना बसला. पिंपळेश्वरने मात्र पराभूत होऊन देखील बाद फेरी गाठली. गोल्फादेवीने ई गटात मध्यांतरातील १९-२२ अशा पिछाडीवरून जय भारत संघाचे आव्हान ३८-३३ असे परतवून लावले. सिद्धेश पिंगळे, धनंजय सरोज, जयेश बोरशी यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या ड गटातील विजयी उपविजयी ठरविण्याकरिता झालेल्या सामन्यात बंड्या मारुतीने लायन्स स्पोर्ट‌्सचा ३९-३४ असा पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in