जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : मीनाक्षी हुडा फायनलमध्ये; मोंगालियाच्या बॉक्सरला पराभूत करत आगेकूच

भारताच्या मीनाक्षी हुडाने विजयी घोडदौड कायम राखत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे. शनिवारी झालेल्या लढतीत मीनाक्षीने मोंगालियाच्या लुत्साइखेनी अल्तान्सेतेगचा पराभव करत आगेकूच केली.
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : मीनाक्षी हुडा फायनलमध्ये; मोंगालियाच्या बॉक्सरला पराभूत करत आगेकूच
Photo : X (@jon_selvaraj)
Published on

लिव्हरपूल : भारताच्या मीनाक्षी हुडाने विजयी घोडदौड कायम राखत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे. शनिवारी झालेल्या लढतीत मीनाक्षीने मोंगालियाच्या लुत्साइखेनी अल्तान्सेतेगचा पराभव करत आगेकूच केली.

माजी आशियाई विजेती आणि विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या मीनाक्षीने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील उपविजेत्या आल्तनसेत्सेगला ५-० असे पराभूत केले.

२४ वर्षीय मीनाक्षी ही जैसमिन लँबोरीया (५७ किलो) आणि नुपूर शिओरन (८० किलो) यांच्यासह अंतिम फेरीत पोहचलेली तिसरी भारतीय बॉक्सर आहे. त्यामुळे यांच्याकडून भारतीय चाहत्यांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

स्पर्धेत मीनाक्षीची कामगिरी शानदार राहिली आहे. तिने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्वच लढती एकतर्फी जिंकल्या आहेत.

पहिल्या फेरीत तिला बाय मिळाल्यानंतर तिने चीनच्या वांग किउपिंग आणि इंग्लंडच्या अॅलिस पम्फ्रे यांचा ५-० असा धुव्वा उडवला.

सुरुवातीपासूनच मीनाक्षीने सामन्यावर वर्चस्व गाजवले. पहिल्या फेरीत तिच्या जोरदार बॅकहँड पंचमुळे मंगोलियाची बॉक्सर जमिनीवर पडली. अल्तान्सेतेगने मीनाक्षीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु मीनाक्षीसमोर ती कमजोर ठरली. सामन्यातील सर्व तिनही फेऱ्या एकतर्फी जिंकत मीनाक्षीनेआगेकूच केली.

शुक्रवारी महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीनाक्षीने इंग्लंडच्या एलिस पुम्पेला ५-० असे एकतर्फी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती.

लिव्हरपूल, इंग्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत महिला व पुरुष बॉक्सर मिळून भारताचे २० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेत भारताच्या पुरुष बॉक्सर्सनी निराश केले. भारताच्या सर्व पुरुष बॉक्सर्सचे आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. जादुमनी सिंगला पुरुषांच्या ५० किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या संझारकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या गुरुली लाशाने भारताच्या अभिनाश जामवालला ४-१ असे पराभूत केले. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकण्याची अपेक्षा आता महिला बॉक्सर्सच्या खांद्यावर आहे. महिलांच्या विभागात निखत झरीन व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहैन यांनादेखील स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश आले.

मीनाक्षीसमोर कझाकस्तानच्या नाझीमचे आव्हान

मीनाक्षी हुडा आता अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझीम किजाइबायशी भिडणार आहे. जून-जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाझीमकडूनच मीनाक्षीला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय बॉक्सरकडे आहे. त्यामुळे या लढतीकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा आहेत.

logo
marathi.freepressjournal.in