
ॲडलेड : अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (४८ धावांत ६ बळी) भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय फलंदाजांनी स्वत:ही हाराकिरी करत ऑस्ट्रेलियाचे काम काहीसे सोपे केले. त्यामुळे गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या उभय संघांतील दुसऱ्या दिवसरात्र कसोटीत रोहित शर्माच्या शिलेदारांचा पहिला डाव ४४.१ षटकांत १८० धावांत आटोपला. अष्टपैलू नितीश रेड्डीने (५४ चेंडूंत ४२ धावा) भारताकडून एकाकी झुंज दिली.
ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर मग ऑस्ट्रेलियाने ३३ षटकांत १ बाद ८६ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात अद्याप ९४ धावांनी पिछाडीवर असून सलामीवीर नॅथन मॅकस्वीनी ३८, तर मार्नस लबूशेन २० धावांवर नाबाद आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी भारताचे गोलंदाज कांगारूंना रोखणार की ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी घेण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत खेळवण्यात येणाऱ्या पाच लढतींच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या दोन दिवसीय सराव लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश संघाचा पराभव करून आपण गुलाबी चेंडूच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र तरीही दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची दैना उडाली.
जवळपास ४ वर्षांपूर्वी ॲडलेड येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताचा संघ ३६ धावांत गारद झाला होता. त्या पराभवाच्या आठवणी काही चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. भारताने त्यावेळी गुलाबी कसोटी गमावूनही मालिका जिंकली होती. मात्र यंदा भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता ५ सामन्यांची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक लढत भारताच्या दृष्टीने निर्णायक आहे.
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागताच संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रोहितने फलंदाजी स्वीकारली. देवदत्त पडिक्कलच्या जागी शुभमन गिलही संघात परतला. तर वॉशिंग्टन सुंदरऐवजी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला यावेळी संधी देण्यात आली. मात्र भारताची सुरुवात खराब झाली. स्टार्कने लढतीच्या पहिल्याच चेंडूवर गेल्या सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वालला पायचीत पकडले. यशस्वी यावेळेस भोपळाही फोडू शकला नाही. यानंतर के. एल. राहुल आणि गिल यांची जोडी जमली.
या दोघांनी जवळपास तासभर वेगवान माऱ्याचा नेटाने मुकाबला करतानाच धावगतीही वाढवली. राहुल-गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. मात्र पहिले सत्र संपायला शेवटची पाच षटके असतानाच स्टार्कच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर राहुल फसला. त्याने ६४ चेंडूंत ३७ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र स्टार्कचा बाऊन्सर सोडण्याच्या प्रयत्नात चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या हातात विसावला. विराटने अवघ्या ७ धावा केल्या. हे कमी म्हणून की काय दुसऱ्या बाजूने स्कॉट बोलंडने गिलला ३१ धावांवर पायचीत पकडून भारताची ४ बाद ८१ अशी अवस्था केली.
दुसऱ्या सत्रात रोहित व ऋषभ पंत जोडीवर भारताच्या आशा टिकून होत्या. मात्र ६ वर्षांनी मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या रोहितला बोलंडने ३ धावांवर पायचीत पकडले. तर कर्णधार पॅट कमिन्सने पंतला २१ धावांवर अफलातून चेंडू टाकत बाद केले. ६ बाद १०९ स्थितीतून मग नितीश आणि अश्विन यांनी आक्रमण केले. अश्विनने ३ चौकारांसह झटपट २२ धावा केल्या. मात्र स्टार्कने अश्विन आणि हर्षित राणाला (०) एकाच षटकात माघारी पाठवून भारताविरुद्ध प्रथमच डावात ५ बळी घेण्याची किमया साधली. त्यानंतर हर्षितने ३ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत झटपट ४२ धावा केल्या. मात्र स्टार्कनेच त्याचाही अडसर दूर करून कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यामुळे भारताचा डाव १८० धावांवर संपुष्टात आला. कमिन्स व बोलंड यांनी प्रत्येकी २ बळी घेत स्टार्कला उत्तम साथ दिली.
तिसऱ्या सत्रात मग ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजीला प्रारंभ केला. सूर्यास्ताचा लाभ उचलत प्रकाशझोतात भारताचे गोलंदाज कांगारूंना धक्के देतील, अशी अपेक्षा होती. मात्र बुमराच्या गोलंदाजीवर पंतने मॅकस्वीनीला जीवदान दिले. त्यामुळे पहिल्या विकेटसाठी भारताला ११व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अखेर बुमराने उस्मान ख्वाजाला (१३) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र लबूशेन व मॅकस्वीनी यांच्या जोडीने २२ षटके फलंदाजी करून दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली आहे. विशेषत: भारतीय गोलंदाजांनी स्टम्प्सच्या दिशेने फारशी गोलंदाजी केली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लबूशेन-मॅकस्वीनी यांच्यासह कांगारूंचे अन्य फलंदाज भारताला हैराण करणार की भारतीय गोलंदाज कामगिरी उंचावणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ४४.१ षटकांत सर्व बाद १८० (नितीश रेड्डी ४२, के. एल. राहुल ३७; मिचेल स्टार्क ६/४८)
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३३ षटकांत १ बाद ८६ (नॅथन मॅकस्वीनी नाबाद ३८, मार्नस लबूशेन नाबाद २०; जसप्रीत बुमरा १/१३)
हे आकडे महत्त्वाचे!
४ गेल्या पाचपैकी चार कसोटींच्या पहिल्या डावात भारताला २०० धावाही करता आलेल्या नाहीत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील ४६, दुसऱ्या कसोटीतील १५६, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतील १५० व आताच्या दुसऱ्या कसोटीतील १८० धावांचा समावेश आहे.
६-४८ स्टार्कने कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी पृथकरण नोंदवले. यापूर्वी २०१६मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ५० धावांत ६ बळी मिळवले होते. तसेच भारताविरुद्ध २० कसोटींमध्ये प्रथमच स्टार्कने डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले.
५० बुमरा हा यंदाच्या वर्षात ५० कसोटी बळी पटकावणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच भारताकडून एका वर्षात ५० बळी मिळवारा बुमरा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी कपिल देव (१९७९, १९८३) आणि झहीर खान (२००२) यांनी अशी कामगिरी केली होती.
६नितीश रेड्डीने आतापर्यंतच्या २ कसोटींतील ३ डावांतच ६ षटकार लगावले आहेत. यातील पाच षटकार हे वेगवान गोलंदाजांविरुद्धचे आहेत. भारताकडून ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांना इतके षटकार लगावणारा तो पहिलाच फलंदाज आहे.
सूर्यास्ताची वेळ आणि विक्रमी उपस्थिती
ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात कसोटी पाहण्याची मजा वेगळीच आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशीसुद्धा सायंकाळी ६ ते ७ या वेळेत येथील दृष्य नयनरम्य होते. या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण ५०,१८६ चाहत्यांनी स्टेडियम गाठले. ॲडलेडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासाठी प्रथमच इतकी गर्दी नोंदवण्यात आली. यापूर्वी २०११-१२च्या मालिकेत ॲडलेड कसोटीत ३५,०८१ चाहत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया लढतीचा आस्वाद लुटला होता. तसेच ॲडलेडवरील आजवरच्या कसोटींचा आढावा घेता ५०,१८६ ही चौथ्या क्रमांकाची विक्रमी प्रेक्षकसंख्या ठरली. पुढील दोन दिवस शनिवार-रविवार असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
फिल ह्यूज, रेडपथ यांना आदरांजली
ऑस्ट्रेलियन खेळाडू शुक्रवारी दंडाभोवती काळ्या रंगाच्या फिती बांधून खेळताना दिसले. २०१४मध्ये डोक्याला चेंडू लागल्याने मृत्यू पावलेला फिल ह्यूजच्या निधनाला नुकताच १० वर्षे झाली. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रेडपथ यांचे काही दिवसांपूर्वीय वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. या दोघांच्या आठवणीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या.