मिताली राज नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
 मिताली राज नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणार

न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. तेव्हाच मितालीचे स्वप्न अधुरे राहणार, याची जाणीव झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात मितालीने अर्धशतक झळकावले. दुर्दैवाने भारताने ही लढत गमावली आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीची ती नजाकत चाहत्यांना पाहायला मिळणार नाही; मात्र फ्रँचायझी ट्वेन्टी-२० लीगमध्ये (आयपीएल) ती नव्या जोमाने मैदानात उतरेल.

गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मितालीने दोन विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरण्याबरोबरच तिने एकदिवसीय प्रकारात सात हजार धावांचे शिखर सर केले. अशी कामगिरी करणारी ती एकमेवच; परंतु मितालीला लाभलेल्या या यशामागे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम, तपश्चर्या तसेच जिद्द आहे. मुळात जवळपास दशकभरापूर्वी महिला क्रिकेटला देशामध्ये फक्त नावापुरता किंमत होती. अशा परिस्थितीतही मितालीने चाहत्यांना भारतीय महिला क्रिकेटकडे आकर्षित करून त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासात तिचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंका नाही.

राजस्थानमधील जोधपूर शहरात ३ डिसेंबर, १९८२ रोजी मितालीचा जन्म झाला. साधारणपणे कोणत्याही लहान मुलाप्रमाणे मितालीलासुद्धा झोपेची फार आवड. दुपार होईपर्यंत झोपून राहण्याच्या मितालीच्या सवयीवर भारतीय वायुदलात कार्यरत असणारे वडील दोराय प्रचंड चिडायचे. मितालीची ही सवय मोडून काढण्यासाठी त्यांनी मोठा भाऊ मिथुनच्या साथीने तिला सिंकदराबादला क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कालांतराने संपूर्ण राज कुटुंबही हैदराबाद येथे स्थायिक झाले. तेथूनच मितालीच्या जडणघडणीला प्रारंभ झाला. वयाच्या अवघ्या १० वर्षीच मितालीने हातात बॅट धरली; मात्र क्रिकेटबरोबरच नृत्याचीही तिला फार आवड होती. शालेय पातळीवर भरतनाट्यममध्ये रस असणाऱ्या मितालीने अनेक पारितोषिके जिंकली; मात्र दोन्ही विभागात सारखे नैपुण्य असले तरी कारकीर्द घडवण्यासाठी एकाच क्षेत्राला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने मितालीने वयाच्या १२व्या वर्षी क्रिकेटकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रशिक्षक संपत कुमार यांनी मितालीला क्रिकेटची निवड करण्यासाठी मार्गदर्शन केले. पालकांनीसुद्धा मुलीतील क्रिकेटवेड लक्षात घेऊन तिच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.

वयाच्या १६व्या वर्षी १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकावून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केल्यावर मितालीने मागे वळून पाहिले नाही. फलंदाज म्हणून छाप पाडण्यात यशस्वी ठरल्यामुळे लवकरच मितालीच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघहिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या मितालीने २००५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंत नेले; परंतु बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे भारताने शरणागती पत्करली. पराभवानंतर खचून न जाता आणखी एका तपासाठी मितालीने भारतीय महिला क्रिकेटसाठी सर्वस्व झोकून दिले. यादरम्यान तिने अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली, तर तिच्याबरोबरीनेच सुरुवात करणाऱ्या अनेकींना निवृत्त होतानाही पाहिले. मिताली मात्र एकलव्यप्रमाणे एकनिष्ठ राहून विश्वचषकाच्या प्राप्तीसाठी झटत राहिली. दरम्यानच्या काळात भारतात झालेल्या महिलांच्या विश्वचषकादरम्यान प्रेक्षकांना मोफत प्रवेश देऊनही चाहत्यांनी सामन्यांकडे पाठच फिरवली. पुरस्कर्ते आणि पुरुषांच्या बरोबरीने तुलनेच्या शोधात असलेल्या महिलांच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपणही क्वचितच करण्यात यायचे. त्यामुळे भारतीय संघाच्या यशापयशाची पुरेशी माहितीही चाहत्यांपर्यंत पोहोचायची नाही. अशा परिस्थितीत देशात महिला क्रिकेटच्या प्रगतीची धगधगती मशाल पेटवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. सुदैवाने मितालीनेच हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. कोणाच्याही खिजगणतीत नसताना भारताने २०१७मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात धक्कादायक कामगिरीची नोंद करताना थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मितालीने स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करतानाच संघाला ज्याप्रकारे विजयाची दिशा दाखवली, ते वाखाणण्याजोगे होते. झुलन गोस्वामी, पूनम राऊत या अनुभवी खेळाडूंसह स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर यांसारख्या युवांची योग्य मोट बांधून मितालीच्या संघाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यांसारख्या तुलनेने बलाढ्य संघांना साखळीत धूळ चारली. इंग्लंडविरुद्धच्याच अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपदाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला; परंतु दडपणाखाली कामगिरी उंचावण्यात आपण किंचित कमी पडलो.

मात्र हेच हुकलेले जेतेपद देशातील महिला क्रिकेटचे रूप पालटणारे ठरले आणि या प्रवासातील सर्वात मोठा अविभाज्य घटक म्हणजे मिताली. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटची सेवा केल्यानंतरही मितालीची बॅट तेजाने तळपते आहे. ३००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने, १० हजार धावांच्या इमल्यासह शतक-अर्धशतकांचा कित्ता, क्रमवारीत वर्षानुवर्षे टिकवून धरलेले अग्रस्थान हे तिच्या महानतेची साक्ष देतात. मितालीच्या यशोगाथेची दखल आता चित्रपटसृष्टीनेसुद्धा घेतली असून लवकरच तिच्यावर आधारित चरित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एक क्रिकेटपटू, फलंदाज, कर्णधार अशा सर्व पातळ्यांवर छाप पाडणाऱ्या मितालीची अन्य भारतासह अन्य देशांतील खेळाडूंशीसुद्धा सातत्याने तुलना करण्यात येते; परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात, याप्रमाणे मितालीलाही कारकीर्दीतील एका टप्प्यावर टीका आणि विवादांना सामोरे जावे लागले. २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपली मानहानी केल्याचे मितालीने सांगितले. पोवार यांनी प्रत्युत्तर देताना मितालीच्या जिद्दी स्वभावामुळे संघाचे नुकसान होत असल्याची कबुली दिली. त्यापूर्वीचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्याशीही मितालीचे संबंध ठीक नसल्याचे वृत्त त्यावेळी पसरले होते. त्यामुळे भारताच्या खालावलेल्या कामगिरीसाठी मितालीला जबाबदार धरण्यात आले; परंतु मितालीने या गोष्टींकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

मितालीच्या कारकीर्दीतून प्रेरणा घेत भविष्यात भारताला अनेक उदयोन्मुख खेळाडू गवसतील, यात शंका नाही. कारण महिला क्रिकेटसाठी आजही पुरस्कर्ते आणि पुरेशी संधी यांची कमतरता असूनही मितालीने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या विश्वात रमणारी मिताली अखेरच्या लढतीपर्यंत स्वप्नपूर्तीसाठी झटली. विश्वविजेतेपद मिळवता आले नसले तरी भारतीय क्रिकेटसाठी तिने दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे २३ वर्षे क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या मितालीने आता उर्वरित आयुष्यातही अशीच विविध शिखरे सर करीत राहावे, हीच तमाम क्रीडाचाहत्यांची इच्छा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in