
मुंबई : दिल्लीच्या रणजी संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ४५ वर्षीय मिथुन हे बीसीसीआयचे ३७वे अध्यक्ष ठरले. इतिहासात प्रथमच एखादा अनकॅप्ड खेळाडू बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
रॉजर बिन्नी यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नव्या धोरणानुसार त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मिथुन यांचेच पारडे अध्यक्षपदासाठी जड मानले जात होते. त्यांनी एकट्यांनीच या पदासाठी अर्ज केला होता. अखेरीस रविवारी झालेल्या बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मिथुन हे प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेले सलग तिसरे बीसीसीआयचे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी सौरव गांगुली व रॉजर बिन्नी अनुक्रमे बीसीसीआयचे अध्यक्ष होते.
जम्मू आणि काश्मीर येथे जन्मलेल्या मिथुन यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली नाही. मात्र १९९७ ते २०१५ या काळात दिल्लीकडून त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले. तसेच २००७-०८च्या हंगामात दिल्लीला रणजी जेतेपदाची दिशा दाखवली. २०१५-१६च्या रणजी हंगामात मिथुन यांनी जम्मू संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच आयपीएलमध्ये खेळणारे ते जम्मूचे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. मिथुन यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांत २७ शतकांसह ९,७१४ धावा केल्या. तसेच १३० लिस्ट-ए व ९१ टी-२० सामनेही ते खेळले. आयपीएलमध्ये मिथुन यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांचे प्रतिनिधित्व केले.
निवृत्तीनंतर प्रशिक्षणाकडे वळालेल्या मिथुन यांनी २०१७मध्ये पंजाब किंग्ज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली. २०१९मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व २०२२मध्ये गुजरात टायटन्स संघाच्या प्रशिक्षकीय चमूत होते. बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघालाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याशिवाय काही वर्षांपूर्वी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेतील कारभार सुरळीत व्हावा, तेथील राजकारण संपून पारदर्शकता यावी, यासाठी मिथुन यांची बीसीसीआयने त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली होती. त्यामुळे मिथुन यांना संघटनात्मक कामकाजाचाही अनुभव आहे. गेल्या काही वर्षांत जम्मूच्या रणजी संघाने भरारी घेतली आहे. यामध्येही मिथुन यांचे नक्कीय मोलाचे योगदान आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला कायम आहेत. बिन्नी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सोडल्यानंतर काही काळासाठी शुक्ला अध्यक्षपद भूषवत होते. तसेच सचिवपदही देवजीत साइकिया यांच्याकडे कायम आहे. खजिनदारपदी रघुराम भट यांची निवड करण्यात आली आहे. भट हे २०२२ ते २०२५ या काळात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपेल. मग ते बीसीसीआयच्या खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारतील. प्रभतेज सिंग भाटिया यांच्याकडे संयुक्त सचिव हे पद सोपवण्यात आले आहे.
त्याशिवाय आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून अरुण धुमाळ यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. आता बीसीसीआयच्या नव्या पदाधिकारांची ही फळी भारतीय क्रिकेटला आणखी प्रगतीवर घेऊन जाण्याच्या निर्धाराने कार्य करतील, हीच चाहत्यांना अपेक्षा आहे. मुख्य म्हणजे मिथुन यांना देशांतर्गत क्रिकेटची योग्य जाण असल्याने ते रणजी स्पर्धा व स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीलाही तितकेच महत्त्व देतील, अशी आशा आहे.
ओझा, रुद्रप्रताप निवड समिती सदस्य
भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा व डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यांचा राष्ट्रीय निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. मुंबईकर अजित आगरकर हे निवड समितीचे अध्यक्ष असून आता या समितीत ओझा, रुद्रप्रताप, शिवसुंदर दास, अजय रत्रा यांचा समावेश आहे. तमिळनाडूच्या एस. शरथ यांची राष्ट्रीयऐवजी पुन्हा कनिष्ठ विभागाच्या निवड समितीत बदली झाली आहे. निवड समितीत प्रत्येक विभागाचा (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य) एक सदस्य असणे आवश्यक आहे.
अमिता शर्मा महिला समितीच्या अध्यक्ष
भारताच्या ४३ वर्षीय माजी क्रिकेटपटू अमिता शर्मा यांनी महिलांच्या राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे अमिता यांची निवड करण्यात आली. अमिता यांनी २००२ ते २०१४ या काळात ११६ एकदिवसीय, ४१ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. महिलांच्या निवड समितीत सुलक्षणा नाईक, जया शर्मा, क्षमा डे, श्रवंती नायुडू यांचा समावेश आहे. महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर ही नवी समिती आपापली पदे स्वीकारतील.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. अध्यक्ष म्हणून भारतीय क्रिकेटशी निगडीत योग्य निर्णय घेण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. माझी क्रिकेट कारकीर्द, प्रशिक्षणातील काम व शासकीय कार्याचा अनुभव यांसारख्या गोष्टींमुळे अध्यक्षपदासाठी सर्वांची मते लाभली.
मिथुन मन्हास
कोण आहेत मिथुन मन्हास?
जम्मू येथे जन्मलेल्या मिथुन मन्हास यांनी १९९७मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ते दिल्लीसाठी उजव्या हाताने मधल्या फळीमध्ये फलंदाजी करायचे. याच काळात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली असे दिग्गज संघात असल्याने मिथुन यांना भारताकडून खेळण्याची संधी लाभली नाही.
त्यांनी दिल्लीच्या रणजी संघाचे नेतृत्व केले. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली हे खेळाडू एकेकाळी त्यांच्या नेतृत्वात खेळले. २०१५-१६च्या रणजी हंगामात मिथुन यांनी जम्मू संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच आयपीएलमध्ये खेळणारे ते जम्मूचे पहिले क्रिकेटपटू ठरले होते.
निवृत्तीनंतर प्रशिक्षणाकडे वळालेल्या मिथुन यांनी २०१७मध्ये पंजाब किंग्ज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली. २०१९मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व २०२२मध्ये गुजरात टायटन्स संघाच्या प्रशिक्षकीय चमूत होते. बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघालाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.