क्रिकेट खेळल्याचा पश्चाताप! हैदराबाद स्टेडियमच्या स्टँडवरुन नाव हटवण्याच्या निर्णयामुळे अझरुद्दीन संतप्त, कोर्टात जाणार

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील (उप्पल) नॉर्थ पॅव्हिलियन स्टँडला दिलेले माजी भारतीय कर्णधार मोहम्‍मद अझरुद्दीन यांचे नाव हटवण्याचा आदेश दिल्यानंतर अझरुद्दीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माजी भारतीय कर्णधार मोहम्‍मद अझरुद्दीन
माजी भारतीय कर्णधार मोहम्‍मद अझरुद्दीनसंग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) लोकपाल आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील (उप्पल) नॉर्थ पॅव्हिलियन स्टँडला दिलेले माजी भारतीय कर्णधार मोहम्‍मद अझरुद्दीन यांचे नाव हटवण्याचा आदेश दिल्यानंतर अझरुद्दीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'खेळाचा अपमान' असल्याचे म्हणत अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

'क्रिकेट खेळल्याचा पश्चाताप वाटतो...'

गल्फ न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत अझरुद्दीन म्हणाले, "हे बोलणं कठीण आहे, पण कधी कधी वाटतं की मी क्रिकेट खेळलोच नसतं तर बरं झालं असतं. ज्यांना क्रिकेटमधील काहीच कळत नाही, असे लोक आज या खेळाचं नेतृत्व करत आहेत, हे पाहून फार वाईट वाटतं. हा खेळासाठी मोठा कलंक आहे."

नैतिकतेचा मुद्दा, हितसंबंधांच्या आरोपांमुळे नाव हटवले

क्रिकबझच्या वृत्तानुसार, HCA च्या नॉर्थ पॅव्हिलियन स्टँडला दिलेले अझरुद्दीन यांचे नाव हटवण्यासंबंधी कारवाई न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या (HCA चे नीतिनियम अधिकारी आणि लोकपाल) यांनी दिलेल्या आदेशानंतर करण्यात आली. Lord's Cricket Club या स्थानिक संघटनेने अझरुद्दीन यांच्यावर एचसीएच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्वार्थी निर्णय घेण्याचे, हितसंबंध बाळगल्याचे गंभीर आरोप करत लेखी तक्रार दाखल केली होती.

आयपीएलच्या तिकिटांवरही नाव नको

IPL 2025 हंगामातील कोणत्याही सामन्याच्या तिकिटांवरही अझरुद्दीन यांचं नाव छापू नये, असा स्पष्ट आदेश असोसिएशनला देण्यात आला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये IPL 2025 मधील आणखी पाच सामने खेळवले जाणार आहेत, त्यात सनरायझर्स हैदराबादचे तीन घरच्या मैदानावरील सामने, तसेच क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर यांसारखे अत्यंत महत्त्वाचे प्लेऑफ सामने होणार आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव देण्याची मागणी

या प्रकरणातील तक्रारदार Lord's Cricket Club ने अझरुद्दीन यांचं नाव हटवण्याच्या मागणीपलीकडे जाऊन, "North Pavilion Stand" चे नामकरण 'VVS Laxman Pavilion' म्हणून करावं, अशी मागणी केली आहे. हैदराबादचे माजी फलंदाज लक्ष्मण यांच्या योगदानाची दखल घेत ही मागणी करण्यात आली आहे. हे नामकरण केवळ फिजिकल साइनबोर्डपुरतं मर्यादित न राहता, तिकिटं, अधिकृत दस्तऐवज, आणि अन्य सर्व माध्यमांवर देखील लक्ष्मण यांचं नाव वापरण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

लक्ष्मणचे नाव हटवायला मी काय मूर्ख आहे का?

स्वतःच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावाच्या स्टँडला स्वतःचे नाव दिल्याचा आरोपही अझरुद्दीन यांनी स्पष्ट नाकारला आणि "मी काय मूर्ख आहे का की लक्ष्मणसारख्या दिग्गजाचं नाव स्टँडवरून हटवेन? तो आमच्या क्षेत्रातून १०० हून अधिक कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. नॉर्थ स्टँडमध्ये पॅव्हेलियनचे नाव लक्ष्मणच्या नावे आहे आणि ते आजही तसंच आहे. तुम्ही तपासून पाहू शकता," असे सांगितले.

मी कायदेशीर लढा देणार

अझरुद्दीन पुढे म्हणाले, "हे फक्त माझ्याशी संबंधित नाही. सनरायझर्स हैदराबाद संघालाही HCA सोबत पासेसच्या वादात अडकावं लागलं होतं. या सगळ्यातून चुकीच्या व्यवस्थापनाचा आणि अंतर्गत संघर्षाचा एक पॅटर्न स्पष्टपणे दिसतो. या अन्यायाविरोधात मी कायदेशीर लढा देणार असून BCCI ने यात लक्ष घालावे, अशी मी विनंती करतो," असे ते म्हणाले. जे काही घडत आहे ते आकलनाच्या पलीकडे आहे आणि ते मला वैयक्तिक पातळीवर दुखावतेय. मी केवळ HCA मधील भ्रष्टाचार उघड केल्यामुळेच मला निवडणूक लढण्याची संधी दिली गेली नाही. सत्य बोलल्यामुळेच मी निशाण्यावर आलो आहे", असेही अझरुद्दीन म्हणाले. "मी निश्चितच कायदेशीर मार्गाचा अवलंब करेन आणि या आदेशाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करेन. भारताच्या कर्णधाराचे नाव हटवण्यास सांगितले जात आहे हे लज्जास्पद आहे," असे अझरुद्दीन म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in