केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे भलतेच वर्चस्व दिसून आले. केपटाउन येथील न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर एका दिवसातच तब्बल २३ फलंदाज बाद झाले.
मोहम्मद सिराजने (१५ धावांत ६ बळी) केलेल्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेचा पहिला डाव २३.२ षटकांत अवघ्या ५५ धावांत आटोपला. त्यानंतर लुंगी एन्गिडी, कॅगिसो रबाडा व नांद्रे बर्गर यांच्या वेगवान त्रिकुटाने भारताला पहिल्या डावात ३४.५ षटकांत १५३ धावांत गुंडाळले. मात्र भारताने ९८ धावांची निर्णायक आघाडी मिळवली. मग दुसऱ्या डावात भारताने आफ्रिकेची पहिल्या दिवसअखेर ३ बाद ६२ अशी अवस्था केली आहे. एडीन मार्करम ३६, तर डेव्हिड बेडिंगहॅम ७ धावांवर खेळत असून आफ्रिका अद्याप ३६ धावांनी पिछाडीवर आहे. भारतासाठी मुकेश कुमारने दोन, तर जसप्रीत बुमराने एक बळी मिळवला आहे. त्यातच भरवशाचा डीन एल्गर (१२) माघारी परतला असल्याने दुसऱ्या दिवशीच लढतीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
कारकीर्दीतील अखेरची कसोटी खेळणाऱ्या एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र सिराजपुढे आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. एल्गरही अवघ्या ४ धावांवरच बाद झाला. सिराजला बुमरा व मुकेश यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. त्यानंतर भारतानेही यशस्वी जैस्वालला शून्यावरच गमावले. मात्र कर्णधार रोहित शर्मा (३९) व शुभमन गिल (३६) यांनी आक्रमक फलंदाजी केली. बर्गरने या दोघांसह श्रेयस अय्यरला शून्यावर बाद केले. त्यानंतर विराट कोहली व के. एल. राहुल यांनी भारताला सावरले.
४ बाद १५३ धावांवर राहुल ८ धावांवर बाद झाला. तेथून पुन्हा भारतीय फलंदाजांनी रांग लावली व १५३ धावांवरच भारताचा डाव गडगडला. कोहली ४६ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा भोपळाही फोडू शकला नाही. भारताचे एकंदर ६ फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांवर दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ अोढवली. या कसोटीसाठी भारताने रविचंद्रन अश्विनच्या जागी जडेजाला, तर शार्दूल ठाकूरच्या जागी मुकेशला पदार्पणाची संधी दिली.
विराट, राहुलची क्रमवारीत आगेकूच
दुबई : विराट कोहली व के. एल. राहुल या भारतीय फलंदाजांनी जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आगेकूच केली. २०२३मध्ये अव्वल १० फलंदाजांतून बाहेर पडलेला विराट आता पुन्हा नवव्या स्थानी आला आहे. विराटने चार स्थानांनी आगेकूच केली. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात शतक झळकावलेल्या राहुलने ११ स्थानांची झेप घेताना ५१वा क्रमांक मिळवला. रोहितची मात्र १४व्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान आहे. गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन अग्रस्थानी कायम आहे. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमरा यांनी आपापले चौथे व पाचवे स्थान टिकवले आहे. अष्टपैलूंमध्ये जडेजा अग्रस्थानावर आहे.
२ कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ फलंदाज बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९०२मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटीत २५ फलंदाज बाद झाले होते.
संक्षिप्त धावफलक
g दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २३.२ षटकांत सर्व बाद ५५ (कायले वेरान १५; मोहम्मद सिराज
g भारत (पहिला डाव) : ३४.५ षटकांत सर्व बाद १५३ (विराट कोहली ४६, लुंगी एन्गिडी ३/३०, कॅगिसो रबाडा ३/३८)
g दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : १७ षटकांत ३ बाद ६२ (एडीन मार्करम नाबाद ३६, मुकेश कुमार २/२५, जसप्रीत बुमरा १/२५)