सदाबहार सिराजने वर्कलोडची संकल्पना धुडकावली : गावस्कर

मोहम्मद सिराजने या संपूर्ण मालिकेत एका लढवय्याप्रमाणे खेळ केला. माझ्यासाठी तोसुद्धा मालिकावीर पुरस्काराचा हकदार होता. सिराजने वर्कलोड मॅनेजमेंटची संकल्पना पूर्णपणे धुडकावून लावली, अशा शब्दांत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सिराजचे कौतुक केले.
सदाबहार सिराजने वर्कलोडची संकल्पना धुडकावली : गावस्कर
Published on

लंडन : मोहम्मद सिराजने या संपूर्ण मालिकेत एका लढवय्याप्रमाणे खेळ केला. माझ्यासाठी तोसुद्धा मालिकावीर पुरस्काराचा हकदार होता. सिराजने वर्कलोड मॅनेजमेंटची संकल्पना पूर्णपणे धुडकावून लावली, अशा शब्दांत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सिराजचे कौतुक केले.

३१ वर्षीय सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाचही सामन्यांत खेळताना सर्वाधिक २३ बळी मिळवले. तसेच सिराजने संपूर्ण मालिकेत १,११३ चेंडू टाकले. तो क्षेत्ररक्षण करतानाही क्वचितच मैदानाबाहेर दिसला. त्यामुळे गावस्कर यांनी सिराजच्या तंदुरुस्तीकडे लक्ष वेधले. तसेच वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली खेळाडूंना विश्रांती देण्याची प्रथा बंद करावी, असेही गावस्कर यांनी सुचवले आहे.

“जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा तुम्ही सर्व वेदना विसरता. सीमेवरती देशाचे सैनिक उभे असताना असंख्य आव्हानांना सामोरे जातात. त्यांनाही वेदना होतात. मात्र ते विश्रांती मागत नाहीत. सिराजने पाचव्या कसोटीत जणू संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व केले. एकदाही तो थकलेला जाणवलेला नाही. किंवा त्याने हार मानली आहे, असे दिसले नाही,” असे गावस्कर म्हणाले. मात्र गावस्करांनी आपल्या मताचा चुकीचा अर्थ काढून जसप्रीत बुमरावर निशाणा साधू नये, असे सांगितले.

“बुमराची दुखापत गंभीर होती. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही खेळाडूंना गरज नसताना विश्रांती देणे चुकीचे वाटते. भारतीय क्रिकेटमधून वर्कलोडची संकल्पनाची काढून टाकण्यात यावी. जर खेळाडू दुखापतग्रस्त नसेल, तर त्याने मालिकेतील सर्व सामने खेळणे गरजेचे आहे,” असेही गावस्कर यांनी सांगितले.

बुमरासुद्धा विजयाचा भाग हवा होता : सिराज

इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या पाचव्या कसोटीतील विजयाचा जसप्रीत बुमरासुद्धा भाग हवा होता. मला त्याची जल्लोषादरम्यान सातत्याने आठवण आली, असे मत सिराजने पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

“या संपूर्ण मालिकेत ज्या-ज्या खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले, त्या सर्वांचे अभिनंदन. इंग्लंडने आम्हाला प्रत्येक लढतीत झुंज दिली. त्यामुळेच आम्ही आमचे सर्वोत्तम योगदान देऊ शकलो. हा विजय मला दीर्घकाळासाठी स्मरणात राहील,” असे बुमरा म्हणाला.

“बुमरा सध्या येथे असता, तर नक्कीच आणखी आनंद झाला असता. बुमराच्या संघात असण्याने वेगळाच प्रभाव पडतो. माझ्यासाठी तो मित्र, गुरू सर्वच आहे. बुमराच्या साथीने गोलंदाजी करण्यासाठी मी नेहमीच आतुर असतो,” असेही सिराजने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in