मोहम्मद सिराजच्या दमराज कामगिरीच्या बळावर भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. कोलंबोत रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपूढे श्रीलंका संघाचा डाव ५० धावांत आटोपला. श्रींलंकेचं हे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केलं. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं असून श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकच्या फायनलमध्ये मात दिली आहे.
श्रीलंकेने दिलेलं ५१ धावांचं आव्हान भारतीय संघाने ६.१ षटाकात तडीस नेलं. भारतीय संघाने दहा विकेट राखत श्रीलंकेच्या संघाचा पराभव केला आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत शुभमन गिलने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली.
कोलंबोत सुरु असलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंका संघाचा डाव ५० धावांत गुंढाळला. मोहम्मद सिराजने या सामन्यात श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत धाडलं. तर हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर मोहम्मद सिराज नावाच्या वादळाने तुफान खेळी करत भारताला आठव्यांदा आशिया चषकाचा विजेतापद मिळवून दिलं आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला आहे.