मोहित अवस्थीचे सात विकेट्स; मुंबईकडे दुसऱ्या दिवसअखेर ११२ धावांची आघाडी, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

पहिल्या डावात ७ धावांची माफक आघाडी घेणाऱ्या मुंबईने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद १०५ धावा करत एकूण ११२ धावांची आघाडी घेतली आहे.
मोहित अवस्थीचे सात विकेट्स; मुंबईकडे दुसऱ्या दिवसअखेर ११२ धावांची आघाडी, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

थुंबा : मुंबईचा पहिला डाव २५१ धावांवर संपुष्टात आल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर मुंबईने वर्चस्व गाजवले. मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने घेतलेल्या सात विकेट्सच्या जोरावर ४१वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने केरळचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आणला. पहिल्या डावात ७ धावांची माफक आघाडी घेणाऱ्या मुंबईने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद १०५ धावा करत एकूण ११२ धावांची आघाडी घेतली आहे.

रोहन कुन्नूम्मल आणि कृष्णा प्रसाद यांनी केरळला चांगली सुरुवात करून दिली. मात्र आठव्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर मोहित अवस्थीने ही जोडी फोडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने कृष्णाला (२१) बाद केल्यावर पाचव्या चेंडूवर रोहन प्रेम (०) याला यष्टीरक्षक प्रसाद पवारकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहन आणि सचिन बेबी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. शिवम दुबेने रोहनचा (५६) त्रिफळा उडवला. कर्णधार संजू सॅमसनने ३८ धावांचे योगदान दिले असले तरी त्याला शम्स मुलानीने माघारी पाठवले.

केरळचा संघ ४ बाद २२१ अशा अवस्थेत असताना मोहित अवस्थीने यजमानांना चांगलाच दणका दिला. केरळचे उर्वरित सहा फलंदाज २३ धावांत बाद करत मुंबईने छोटी का होईना पण महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मोहित अवस्थीने ५७ धावा देत ७ विकेट्स मिळवले. मुलानी, दुबे आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

मुंबईने दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली. जय बिश्त आणि भूपेन ललवानी यांनी तब्बल २६ षटके खेळून काढत मुंबईची पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसअखेर बिश्त ५९ तर ललवानी ४१ धावांवर खेळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in