विराटच्या मार्गदर्शनामुळे मनोबल उंचावले - स्मृती; आरसीबीच्या जेतेपदामुळे बंगळुरूत दिवाळी साजरी

२००८मध्ये पुरुषांच्या आयपीएलला प्रारंभ झाला. तेव्हापासून १६ हंगाम झाले तरी बंगळुरूला एकदाही ती स्पर्धा जिंकता आलेली नाही. दुसरीकडे महिलांच्या बंगळुरू संघाने मात्र दुसऱ्याच पर्वात डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले.
विराटच्या मार्गदर्शनामुळे मनोबल उंचावले - स्मृती; आरसीबीच्या जेतेपदामुळे बंगळुरूत दिवाळी साजरी

नवी दिल्ली : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी महिलांच्या प्रीमियर लीगचे (डब्ल्यूपीएल) विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला ८ गडी राखून धूळ चारली. या विजयानंतर स्मृतीने विराट कोहलीने संघाला केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले, असे सांगितले. आरसीबीच्या विजयाचा बंगळुरूत मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे. दिवाळीच्या स्वरूपात तेथे चाहते रस्त्यावर उतरले आहेत.

२००८मध्ये पुरुषांच्या आयपीएलला प्रारंभ झाला. तेव्हापासून १६ हंगाम झाले तरी बंगळुरूला एकदाही ती स्पर्धा जिंकता आलेली नाही. दुसरीकडे महिलांच्या बंगळुरू संघाने मात्र दुसऱ्याच पर्वात डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले. गतवर्षी बंगळुरूला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यावेळी विराटने सर्व खेळाडूंची भेट घेत त्यांचे मनोबल उंचावले. त्याशिवाय या हंगामातसुद्धा तो खेळाडूंशी अधूनमधून मोबाईलद्वारे संवाद साधत होता, असेही स्मृतीने सांगितले. रविवारी जेतेपद मिळवल्यानंतरसुद्धा विराट स्मृतीशी संवाद साधत असतानाचे छायाचित्र समाज माध्यमांवर वायरल होत आहे.

“गेले वर्ष आमच्यासाठी फारच आव्हानात्मक होते. यंदा मात्र आम्ही आमच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. संघातील प्रत्येकाने मेहनत घेतली तसेच विराटनेसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे नक्कीच लाभ झाला,” असे स्मृती म्हणाली. त्याशिवाय एलिस पेरी, सोफी डिवाईन यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसह खेळल्याने संघातील युवा खेळाडूंना लाभ झाला, असे मत स्मृतीने नोंदवले.

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाच्या खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपही जिंकली आहे. एलिस पेरीने आरसीबीकडून ऑरेंज कॅप जिंकली आहे. तिने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय श्रेयांका पाटीलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी करत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच कारणामुळे तिला पर्पल कॅप मिळाली आहे. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही श्रेयंकाच्या खात्यात गेला आहे. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार आरसीबीच्याच सोफी मोलिनिक्सने मिळवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in