
३६ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या संघाने सर्वाधिक ११० पदके पटकाविली. महाराष्ट्राच्या नावे प्रत्येकी २८ सुवर्ण, ८२ रौप्य यासह सर्वाधिक ५४ कांस्यपदके मिळविली आहेत. सर्वाधिक ४५ सुवर्णपदके जिंकणारा सेना दल (सर्व्हिसेस) संघ १०४ पदकांसह अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ हरियाणा संघाने ८३ पदकांसह दुसऱ्या स्थान मिळविले आहे. हरियाण संघ दोन सुवर्णपदकांच्या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या एक स्थान पुढे आहे. हरियाणाची ३०, तर महाराष्ट्राला २८ सुवर्णपदके मिळाली आहेत.
महाराष्ट्राचा महिला संघ वॉटर पोलोमध्ये अजिंक्य ठरला. तसेच पुरुषांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र पुरुष संघ मल्लखांबमध्ये रौप्यपदक विजेता ठरला. ज्युडोमध्ये स्नेहल खावरेने; तर सायकलिंग प्रकारात पूजाने कांस्यपदकावर मिळविले.
नागपूरचा राष्ट्रीय योगपटू वैभव श्रीरामेने योगासनातील सातत्य कायम राखत सुवर्णपदकांचा डबल धमाका उडविला. त्याने पुरुषांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटात चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकाविला. नागपूरची छकुली सेलोकर सलग दुसऱ्या दिवशी रौप्यपदकाची मानकरी ठरली. तिने महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये रौप्यपदक मिळविले. रत्नागिरीच्या पूर्वाने महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. नागपूरचा योगपटू श्रीरामेने योगासन खेळ प्रकारात दोन दिवसांत महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. योगासन संघाने या पाच पदके जिंकली. यात वैभवच्या दोन सुवर्ण आणि छकुलीच्या दोन रौप्यपदकांचा समावेश आहे.
वैभव श्रीरामेने पुरुषांच्या आर्टिस्टिक गटामध्ये फायनल गाठत १३६.५२ गुणांची कामगिरी केली. यासह तो या गटामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. छकुलीने पदकाची आपली मोहीम कायम ठेवली. तिने महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये दुसऱ्या स्थानी धडक मारली. तिने या गटाच्या फायनलमध्ये १२७.६८ गुण संपादन केले. तिला रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले. पूर्वा किनारे हिने पदार्पणात आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये कांस्यपदक जिंकले.
ज्युडोपटू स्नेहल खावरेने ५२ किलोखालील वजनी गटात कांस्यपदकाची मानकरी ठरताना राजस्थानच्या टिना शर्माला मागे टाकले. दुसरी ज्युडोपटू शुभांगी राऊतला ५७ किलोखालील वजन गटात सलामीलाच पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्र महिला वॉटर पोलो संघाने फायनलमध्ये केरळ संघावर ५-३ असा रोमहर्षक विजय मिळवत विजेतेपदाचा मुकूट चढविला. पुरुष संघाला बंगालने ८-७ ने नमविल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राने मल्लखांब स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटात १३१.५ गुण वसूल करीत रौप्यपदक पटकाविले. अक्षय सरळ, शुभंकर खवले, आदित्य पाटील, दीपक शिंदे, सागर राणे व कृष्णा यांनी चमकदार कामगिरी केली.