हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामालासुद्धा मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे पराभवाने सुरुवात केली. त्यामुळे आता बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या लढतीद्वारे मुंबईचा संघ गुणांचे खाते उघडण्यास आतुर आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्व कौशल्याकडेही सर्वांचे लक्ष लागून असेल. त्याशिवाय जसप्रीत बुमरा आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांमधील द्वंद्व पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
पाच वेळच्या विजेत्या मुंबईला २०१३पासून पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांना ३६ चेंडूंत ४८ धावांचे आव्हानही पार करता आले नाही व मुंबईने ६ धावांनी पराभव पत्करला. या लढतीत हार्दिकने गोलंदाजीत केलेले बदल तसेच फलंदाजीत स्वत:ही उशिराने फलंदाजी येत संघाला अडचणीत टाकले, अशी चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू आहे. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाचा दुसऱ्या लढतीत कस लागेल. त्याच्यासमोर विश्वविजेता ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या हैदराबादला रोखण्याचे कडवे आव्हान असेल.
दुसरीकडे, कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने पहिल्या लढतीत कोलकाताला विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजवले. मात्र त्यांनाही अवघ्या ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तारांकित विदेशी खेळाडूंचा हैदराबादकडे भरणा आहे. त्यामुळे ते घरच्या मैदानावर यंदाच्या हंगामातील पहिली लढत खेळताना चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. येथील खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळेल. तसेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे २००हून अधिक धावा करण्याची उत्तम संधी आहे.
रोहित, बुमरा लयीत; किशनवर दडपण
कर्णधारपद गेले असले तरी रोहितने पहिल्याच लढतीत फलंदाजीद्वारे तो मुंबईसाठी किती उपयुक्त आहे, हे दाखवून दिले. रोहितने २९ चेंडूंतच ४३ धावा फटकावल्या. मात्र त्याचा सलामीचा साथीदार इशान किशन भोपळाही फोडू शकला नव्हता. टी-२० विश्वचषकाचा विचार करता यष्टिरक्षकासाठी फारच स्पर्धा असल्याने किशनला आता कामगिरी उंचवावी लागेल. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या लढतीसही मुकणार आहे. त्यामुळे मधल्या फळीत हार्दिक, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस व टिम डेव्हिड यांना जबाबदारी पेलावी लागेल. मुंबईची गोलंदाजी मात्र धारदार वाटत असून याचे मुख्य कारण पहिल्याच सामन्यात ३ बळी घेणारा जसप्रीत बुमरा आहे. त्याशिवाय जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड यांची वेगवान जोडी व पियूष चावला, शम्स मुलाणी यांची फिरकी जोडीही धावा रोखण्यात पटाईत आहे.
क्लासेन, कमिन्सवर हैदराबादची मदार
कोलकाताविरुद्ध २९ चेंडूंत ८ षटकारांसह ६३ धावांची तुफानी खेळी साकारणारा हेनरिच क्लासेन गेल्या काही काळापासून भन्नाट फॉर्मात आहे. त्याला मयांक अगरवाल व अभिषेक शर्मा या सलामीवीरांचीही उत्तम साभ लाभली. मात्र मधल्या फळीची हैदराबादला मुख्य चिंता आहे. राहुल त्रिपाठी, एडीन मार्करम, अब्दुल समद यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. गोलंदाजीत कमिन्स, भुवनेश्वर कुमार व टी. नटराजन या वेगवान त्रिकुटावर हैदराबादची भिस्त आहे. मयांक मार्कंडे व शाहबाज अहमद हे फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. मात्र ग्लेन फिलिप्स किंवा वानिंदू हसरंगाला हैदराबाद संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुशारा, विष्णू विनोद, नेहल वधेरा.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, वानिंदू हसरंगा, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव.