मुंबई-बडोद्यात आज अंतिम फेरीसाठी शर्यत; मुश्ताक अली स्पर्धेच्या अन्य उपांत्य लढतीत दिल्ली-मध्य प्रदेश आमनेसामने

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धा: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने शुक्रवारी खेळवण्यात येणार आहेत. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत मुंबई विरुद्ध बडोदा हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.
मुंबई-बडोद्यात आज अंतिम फेरीसाठी शर्यत; मुश्ताक अली स्पर्धेच्या अन्य उपांत्य लढतीत दिल्ली-मध्य प्रदेश आमनेसामने
एक्स @KRxtra
Published on

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने शुक्रवारी खेळवण्यात येणार आहेत. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत मुंबई विरुद्ध बडोदा हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्लीसमोर मध्य प्रदेशचे आव्हान असेल.

२३ नोव्हेंबरपासून भारतातील विविध ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १७वे पर्व आहे. ३८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ५ गट करण्यात आले होते. त्यानंतर उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडून चार संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने इ-गटात अग्रस्थान काबिज केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाला धूळ चारली. गेल्या दोन सामन्यात मुंबईने २२०हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास बळावलेला आहे. मुंबईच्या या वाटचालीत अनुभवी सलामीवीर अजिंक्य रहाणेचे मोलाचे योगदान आहे.

३६ वर्षीय रहाणेने या स्पर्धेत आतापर्यंत ४ अर्धशतकांसह ३३४ धावा केल्या आहेत. गेल्या दोन्ही लढतींमध्ये रहाणेने दडपणाखाली धडाकेबाज खेळी साकारली. त्याशिवाय पृथ्वी शॉ यालाही लय गवसली आहे. मधल्या फळीत श्रेयस व सूर्यकुमार यादव यांच्याकडून योगदान अपेक्षित आहे. शिवम दुबे, सूर्यांश शेडगे उपयुक्त फटकेबाजी करत आहेत. गोलंदाजी मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. शार्दूल ठाकूर व मोहित अवस्थी यांना धावा रोखण्यात अपयश येत आहे.

दुसरीकडे कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली बडोद्याने ब-गटात अग्रस्थान पटकावले. मग उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी बंगालला नेस्तनाबूत केले. पंड्या बंधूंची अष्टपैलू चमक बडोद्यासाठी निर्णायक ठरत असून लुकमन मेरिवाला, भानू पनिया, शाश्वत रावत यांनीही चमक दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

सायंकाळी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीकडून कर्णधार आयुष बदोनी, प्रियांश आर्या, अनुज रावत, इशांत शर्मा यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. मध्य प्रदेशसाठी कर्णधार रजत पाटिदार, वेंकटेश अय्यर, आवेश खान, कुलवंत खेजरोलिया यांनी संपूर्ण स्पर्धेत छाप पाडली आहे. रविवारी बंगळुरूलाच अंतिम सामना रंगणार आहे.

उपांत्य फेरीचे सामने

मुंबई वि. बडोदा (सकाळी ११ वाजल्यापासून)

मध्य प्रदेश वि. दिल्ली (दुपारी ४.३० वाजल्यापासून)

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in