

जयपूर : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी रोहित शर्मा शून्यावरच माघारी परतला. मात्र त्याच्या अपयशानंतरही मुंबईने सलग दुसरा विजय नोंदवला. यष्टिरक्षक हार्दिक तामोरे (८२ चेंडूंत नाबाद ९३ धावा), सर्फराझ खान (४९ चेंडूंत ५५ धावा) व मुशीर खान (५६ चेंडूंत ५५ धावा) या तिघांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर मुंबईने क-गटात उत्तराखंडला ५१ धावांनी पराभूत केले.
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत ७ बाद ३३१ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना उत्तराखंडला ५० षटकांत ९ बाद २८० धावाच करता आल्या. युवराज चौधरीने ९६ धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईकडून कर्णधार शार्दूल ठाकूर, ओमकार तरमळे व मुशीर यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. हार्दिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह मुंबईने गटात अग्रस्थान मिळवले आहे. २ सामन्यांत ८ गुण कमावणाऱ्या मुंबईची आता सोमवारी छत्तीसगडशी गाठ पडेल.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. काही महिन्यांपूर्वी विराट, रोहित रणजी स्पर्धेतही खेळताना दिसले होते. मात्र आता ते दोघेही टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रणजी व मुश्ताक अली स्पर्धेत खेळणे त्यांना बंधनकारक नसेल. रोहित ७ वर्षांनी, तर विराट तब्बल १५ वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झाला आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी पहिले दोन सामने खेळणार असल्याचे समजते. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे दोघेही त्यापूर्वी या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने दोघांनाही संघात टिकून राहायचे आहे. तसेच दोघेही सध्या उत्तम लयीत असल्याचे आफ्रिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिसून आले.
ध्रुवचे सलग पाचवे शतक; विदर्भ विजयी
राजकोट येथे झालेल्या ब-गटातील सामन्यात विदर्भाने हैदराबादवर ८९ धावांनी वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना ध्रुव शोरेच्या ७७ चेंडूंतील नाबाद १०९ धावांच्या खेळीमुळे विदर्भाने ५० षटकांत ५ बाद ३६५ धावांचा डोंगर उभारला. ध्रुवने ९ चौकार व ६ षटकारांसह लिस्ट-ए कारकीर्दीतील सलग पाचवे शतक साकारले. त्याने एन. जगदीशनच्या विक्रमाची बरोबरी केली. अमन मोखाडे (८२) व यश राठोड (६८) यांच्या अर्धशतकांची त्याला उत्तम साथ लाभली. मग हैदराबादचा संघ ४९.२ षटकांत २७६ धावांत गारद झाला. वरुण गौडने ८५ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र हर्ष दुबेने ३, तर नचिकेत भुतेने २ बळी मिळवून विदर्भाला विजय मिळवून दिला. विदर्भाचा हा दोन सामन्यांतील पहिलाच विजय ठरला. ते गटात चौथ्या स्थानी असून पुढील लढतीत त्यांच्यासमोर जम्मू आणि काश्मीरचे आव्हान असेल.
पृथ्वीचे अर्धशतक; महाराष्ट्राने खाते उघडले
क-गटातील अन्य साखळी सामन्यात महाराष्ट्राने सिक्कीमचा ८ गडी व १९२ चेंडू राखून धुव्वा उडवला. याबरोबरच महाराष्ट्राने गुणांचे खाते उघडताना गटात चौथे स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना सिक्कीमचा संघ ४०.२ षटकांत १५० धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने ४, तर रामकृष्ण घोषने ३ बळी मिळवले. मग पृथ्वी शॉ (५१), अर्शीन कुलकर्णी (४०) व कर्णधार ऋतुराज गायकवाड (नाबाद ३८) यांनी उपयुक्त फलंदाजी केल्यामुळे महाराष्ट्राने १८ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. महाराष्ट्राची आता सोमवारी हिमाचल प्रदेशशी गाठ पडेल. राजवर्धनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत ७ बाद ३३१ (हार्दिक तामोरे नाबाद ९३, सर्फराझ खान ५५, मुशीर खान ५५; जगमोहन नागरकोटी १/४४) विजयी
उत्तराखंड : ५० षटकांत ९ बाद २८० (युवराज चौधरी ९६, जगदीश सुचित ५१; शार्दूल ठाकूर २/२८)