मुंबई तब्बल ४८ व्यांदा 'रणजी'च्या अंतिम फेरीत; तामिळनाडूचा १ डाव, ७० धावांनी फडशा; सामनावीर शार्दूलची गोलंदाजीतही चमक

फलंदाजीत शतकी धडाका केल्यानंतर शार्दूल ठाकूरने गोलंदाजीतही कमाल केली. त्याला शम्स मुलाणीआणि तनुष कोटियन या फिरकीपटूंची उत्तम साथ लाभली.
मुंबई तब्बल ४८ व्यांदा 'रणजी'च्या अंतिम फेरीत; तामिळनाडूचा १ डाव, ७० धावांनी फडशा; सामनावीर शार्दूलची गोलंदाजीतही चमक

ऋषिकेश बामणे/मुंबई

फलंदाजीत शतकी धडाका केल्यानंतर शार्दूल ठाकूरने (१६ धावांत २ बळी) गोलंदाजीतही कमाल केली. त्याला शम्स मुलाणी (५३ धावांत ४ बळी) आणि तनुष कोटियन (१८ धावांत २ बळी) या फिरकीपटूंची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने सोमवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा तिसऱ्या दिवशीच तब्बल १ डाव आणि ७० धावांनी फडशा पाडला. याबरोबरच मुंबईने तब्बल ४८व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

बीकेसी येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात तामिळनाडूचा दुसरा डाव अवघ्या ५१.५ षटकांत १६२ धावांत आटोपला. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने तिसऱ्या दिवसातील अखेरच्या सत्रातच विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरी गाठली. पहिल्या डावात मुंबईने २३२ धावांची आघाडी मिळवली होती. हीच त्यांच्या विजयासाठी पुरेशी ठरली. पहिल्या डावात ७ बाद १०६ अशा स्थितीतून शतक साकारण्यासह लढतीत एकूण ४ बळी टिपणाऱ्या पालघरच्या ३२ वर्षीय शार्दूलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता १० मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम मुकाबल्यात मुंबईपुढे विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

रविवारी मुंबईने ९ बाद ३५३ धावांपर्यंत मजल मारून २०७ धावांची आघाडी घेतली. तेथून पुढे सोमवारच्या खेळाला प्रारंभ करताना तनुष आणि तुषार देशपांडे या अखेरच्या जोडीने आक्रमक फटकेबाजी केली. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. वॉशिंग्टन सुंदरने तुषारला २६ धावांवर बाद करून मुंबईचा पहिला डाव १०६.५ षटकांत ३७८ धावांत संपुष्टात आणला. तनुष मात्र १२ चौकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला. तामिळनाडूच्या पहिल्या डावातील १४६ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने ३७८ धावा फटकावून तब्बल २३२ धावांची आघाडी मिळवली. तामिळनाडूसाठी कर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोरने सर्वाधिक ६ गडी बाद केले.

त्यानंतर दुसऱ्या डावात तामिळनाडूचे फलंदाज कडवी झुंज देतील, असे अपेक्षित होते. मात्र शार्दूलने पहिल्या पाच षटकांत स्विंग गोलंदाजीचा अप्रतिम नजराणा पेश केला. त्याने नारायण जगदीशन (०) आणि साई सुदर्शन (५) या सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला सुंदरही (४) छाप पाडू शकला नाही. त्यामुळे तामिळनाडूची ३ बाद १० अशी बिकट अवस्था झाली. बाबा इंद्रजित आणि प्रदोष रंजन पॉल यांनी काहीसा डोलारा सावरून चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची उपयुक्त भागीदारी रचली.

दुसऱ्या सत्रात मग ऑफस्पिनर तनुषने पॉलला (२५) बाद करून ही जोडी फोडली. इंद्रजीतने ९ चौकारांसह हंगामातील चौथे अर्धशतक साकारून एक बाजू सांभाळली. विजय शंकरसह त्याने पाचव्या विकेटसाठी ३८ धावांची भर घातली. मात्र मोहित अवस्थीने ७० धावांवर इंद्रजितचा अडथळा दूर करून तामिळनाडूचा पराभव पक्का केला. त्यानंतर मुलाणी व तनुष यांच्या जोडीने तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. शंकर (२४), किशोर (२१) यांनी काहीसा प्रतिकार केला. अखेर मुलाणीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने संदीप वॉरियरचा झेल पकडून तामिळनाडूचा दुसरा डाव १६२ धावांवर गुंडाळला आणि मुंबईच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. मुलाणीने चार, तर शार्दूल, तनुष व मोहितने प्रत्येकी दोन बळी मिळवले. यष्टिरक्षक हार्दिक तामोरेनेसुद्धा छाप पाडताना ४ झेल टिपले, तर १ यष्टिचीत केला. विक्रमी ४१ वेळा रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा मुंबईचा संघ आता रहाणेच्या नेतृत्वाखाली ४२व्यांदा करंडक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

यंदा रणजी स्पर्धेचा ८९वा हंगाम सुरू असून मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, तर ६ वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

८ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५-१६च्या हंगामात मुंबईने अखेरची रणजी स्पर्धा जिंकली. शार्दूल व श्रेयस त्या संघाचाही भाग होते. त्यानंतर २०१६-१७, २०२१-२२च्या हंगामांमध्ये मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक

-तामिळनाडू (पहिला डाव) : सर्व बाद १४६

-मुंबई (पहिला डाव) : १०६.५ षटकांत सर्व बाद ३७८ (शार्दूल ठाकूर १०९, तनुष कोटियन नाबाद ८९, मुशीर खान ५५; आर. साई किशोर ६/९९)

-तामिळनाडू (दुसरा डाव) : ५१.५ षटकांत सर्व बाद १६२ (बाबा इंद्रजित ७०, प्रदोष रंजन पॉल २५; शम्स मुलाणी ४/५३, शार्दूल ठाकूर २/१६, तनुष कोटियन २/१८)

-निकाल : मुंबई १ डाव आणि ७० धावांनी विजयी

-सामनावीर : शार्दूल ठाकूर

logo
marathi.freepressjournal.in