मुंबईच रणजीचा राजा! तब्बल ४२ व्यांदा करंडकाला गवसणी; विदर्भाच्या वाडकरची झुंज व्यर्थ; मुशीर सामनावीर, कोटियन सर्वोत्तम खेळाडू

वानखेडेच्या रणभूमीत मुंबईने पुन्हा एकदा आपणच ‘रणजीचा राजा’ असल्याचे सिद्ध केले.
मुंबईच रणजीचा राजा! तब्बल ४२ व्यांदा करंडकाला गवसणी; विदर्भाच्या वाडकरची झुंज व्यर्थ; मुशीर सामनावीर, कोटियन सर्वोत्तम खेळाडू

- ऋषिकेश बामणे

वानखेडेवरून...

मुंबई : वानखेडेच्या रणभूमीत मुंबईने पुन्हा एकदा आपणच ‘रणजीचा राजा’ असल्याचे सिद्ध केले. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने (१९९ चेंडूंत १०२ धावा) दिलेल्या शतकी झुंजीमुळे एकवेळ सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक वेळी कामिगरी उंचावली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भाचा १६९ धावांनी धुव्वा उडवला. याबरोबरच मुंबईने आठ वर्षांनी पहिले, तर एकंदर ४२वे रणजी जेतेपद काबिज केले. विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या शिलेदारांनी लक्षवेधी जल्लोष केला.

दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने गेले पाच दिवस रंगलेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी अव्वल दर्जाचा खेळ केला. त्यामुळेच पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत लांबलेल्या या लढतीत कोणता संघ नेमका बाजी मारणार, हे खात्रीने सांगता येणे कठीण होते. ५३८ धावांचा पाठलाग करणाऱ्या विदर्भाने मुंबईला प्रत्येक विकेटसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. मात्र तनुष कोटियनने वाडकरचा अडसर दूर केला आणि त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भाचा दुसरा डाव १३४.३ षटकांत ३६८ धावांत गुंडाळला. मुंबईकडून दुसऱ्या डावात १३६ धावांची जिगरबाज शतकी खेळी साकारणारा १९ वर्षीय मुशीर खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर २५ वर्षीय अष्टपैलू कोटियनला हंगामातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ऑफस्पिनर कोटियनने यंदाच्या स्पर्धेतील १० सामन्यांत २९ बळी मिळवले. त्याशिवाय फलंदाजीतही ५ अर्धशतके व १ शतकाद्वारे ५०२ धावांचे योगदान दिले.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी २९० धावांची, तर मुंबईला ५ बळींची आवश्यकता होती. बुधवारच्या ५ बाद २४८ धावांवरून पुढे खेळताना वाडकर आणि हर्ष दुबे यांनी पहिले सत्र यशस्वीपणे खेळून काढताना ३३ षटकांत ८५ धावा केल्या. दुबेने हंगामातील पहिले अर्धशतक साकारताना ५ चौकार व २ षटकार लगावले, तर २९ वर्षीय वाडकरने शतकाच्या दिशेने कूच करताना एक बाजू सांभाळली. उपहाराला विदर्भाने ५ बाद ३३३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सामना अनिर्णित राहणार की विदर्भ उर्वरित दोन सत्रांमध्ये २०५ धावा करणार, हा प्रश्न निर्माण झाला.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला वाडकरने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील आठवे आणि यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. त्यावेळी स्टेडियममध्ये प्रत्येकाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. वाडकर-दुबे ही जोडी मुंबईला आणखी सतावणार असे वाटत असतानाच कोटियन मुंबईसाठी धावून आला. त्याने १३०व्या षटकात वाडकरला पायचीत पकडून मुंबईला सहावे यश मिळवून दिले. वाडकरने ९ चौकार व १ षटकारासह तब्बल ५ तास झुंज देताना १०२ धावा केल्या. वाडकर व दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी २५५ चेंडूंत १३० धावांची भागीदारी रचली.

दुसऱ्या सत्रात २१ मिनिटांनंतर वाडकरच्या रूपात दिवसातील पहिली विकेट गेल्यावर विदर्भाचा डाव गडगडला. तुषार देशपांडेने पुढच्याच षटकात दुबेला बाद केले. त्याने ६५ धावांची झुंज दिली. मग तुषारनेच आदित्य सरवटेला (३) माघारी पाठवले. कोटियनने यश ठाकूरचा (६) त्रिफळा उडवला. त्यानंतर १३५व्या षटकात अखेरचा रणजी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने उमेश यादवला (६) त्रिफळाचीत करून मुंबईच्या जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले. विदर्भाने अखेरचे पाच फलंदाज अवघ्या १५ धावांत गमावले. मुंबईकडून कोटियनने ४, तर तुषार व मुशीर यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

"मुंबईसारख्या संघाला २२४ धावांवर बाद केल्यावर आम्हाला आघाडी घेण्याची संधी होती. मात्र आम्ही ती गमावली. त्यानंतर दुसऱ्या डावात अज्जू दादा (अजिंक्य रहाणे) व मुशीर यांनी अप्रतिम फलंदाजी करून आम्हाला विजयापासून दूर केले. मात्र मला माझ्या संघाचा अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जेतेपदाच्या दावेदारासारखा खेळ केला."

- अक्षय वाडकर, विदर्भाचा कर्णधार

"वैयक्तिकदृष्ट्या माझी कामगिरी खालावलेली असतानाही संघ विजयी झाल्याने मी सर्वात आनंदी आहे. त्याशिवाय सर्वप्रथमच विदर्भाचे कौतुक. त्यांनी आम्हाला पाचव्या दिवसापर्यंत कडवी झुंज दिली. ५३८ धावांचा पाठलाग करताना त्यांनी सहज हार मानली नाही. गेल्या वर्षी मुंबईला बाद फेरीने एका धावेने हुलकावणी दिली. यंदा मात्र आधीपासूनच जेतेपद मिळवू, याचा विश्वास होता. आम्ही तंदुरुस्तीवर अधिक भर दिला. यामध्ये एमसीए व प्रशिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे."

- अजिंक्य रहाणे, मुंबईचा कर्णधार

"मुंबईच्या प्रशिक्षकपदी जेव्हा नेमणूक झाली, तेव्हापासूनच तंदुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित केले. संघात युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा पुरेसा भरणा होता. प्रशिक्षक म्हणून मी त्यांना फक्त योग्य दिशा दाखवण्याचे काम केले. संघात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर माझा भर होता. त्यामुळे कामगिरी आपोआप उंचावली आणि आम्ही जेतेपद मिळवले. "

- ओमकार साळवी, मुंबईचे प्रशिक्षक

लक्षवेधी आकडेवारी

-यंदाचा हा रणजी स्पर्धेचा ८९वा हंगाम होता. यांपैकी मुंबईने सर्वाधिक ४८ वेळा अंतिम फेरी गाठून ४२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मुंबईने १९३४-३५मध्ये सर्वप्रथम रणजीचे जेतेपद मिळवले होते. मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रणजी जेतेपदे कर्नाटकच्या (८) नावावर आहेत.

-विदर्भाला प्रथमच रणजीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. यापूर्वी २०१७-१८, २०१८-१९च्या हंगामात त्यांनी सलग दोन वेळा जेतेपद मिळवले होते.

-मुंबईने ८ वर्षांनी रणजी स्पर्धा जिंकली. यापूर्वी २०१५-१६च्या हंगामात त्यांनी सौराष्ट्रला नमवून ४१वे जेतेपद पटकावले होते.

-वानखेडेवर झालेल्या रणजीच्या १३ अंतिम सामन्यांपैकी मुंबईने तब्बल ११ वेळा विजय मिळवला आहे. फक्त १९८२-८३ आणि १९९०-९१मध्ये मुंबईला वानखेडेवर अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

संक्षिप्त धावफलक

- मुंबई (पहिला डाव) : २२४

- विदर्भ (पहिला डाव) : १०५

- मुंबई (दुसरा डाव) : ४१८

- विदर्भ (दुसरा डाव) : १३४.३ षटकांत सर्व बाद ३६८ (अक्षय वाडकर १०२, करुण नायर ७४, हर्ष दुबे ६५; तनुष कोटियन ४/९५, मुशीर खान २/४८)

- सामनावीर : मुशीर खान

- मालिकावीर : तनुष कोटियन

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in