गोलंदाजांमुळे मुंबईचा विजयी दांडिया; सलामीच्या लढतीत चंदीगडवर एक डाव आणि १५५ धावांनी वर्चस्व, देशपांडे सामनावीर

Ranji Trophy 2026 : ऑफस्पिनर तनुष कोटियन (३० धावांत ३ बळी) आणि डावखुरा शम्स मुलाणी (६९ धावांत ३ बळी) या फिरकी जोडीसह वेगवान त्रिकुटाने दुसऱ्या डावातही चमकदार कामगिरी केली.
गोलंदाजांमुळे मुंबईचा विजयी दांडिया; सलामीच्या लढतीत चंदीगडवर एक डाव आणि १५५ धावांनी वर्चस्व, देशपांडे सामनावीर
गोलंदाजांमुळे मुंबईचा विजयी दांडिया; सलामीच्या लढतीत चंदीगडवर एक डाव आणि १५५ धावांनी वर्चस्व, देशपांडे सामनावीर(Photo-X)
Published on: 

मुंबई : ऑफस्पिनर तनुष कोटियन (३० धावांत ३ बळी) आणि डावखुरा शम्स मुलाणी (६९ धावांत ३ बळी) या फिरकी जोडीसह वेगवान त्रिकुटाने दुसऱ्या डावातही चमकदार कामगिरी केली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी मुंबईने वानखेडेच्या मैदानात विजयी दांडिया केला. ड-गटातील पहिल्या साखळी सामन्यात चंदीगडचा तिसऱ्या दिवशीच एक डाव आणि १५५ धावांच्या फरकाने फडशा पाडून मुंबईने दणदणीत सलामी नोंदवली. डावाने विजय मिळवल्याने मुंबईला बोनस गुणही मिळाला, हे विशेष.

सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने चंदीगडचा दुसरा डाव ५२.१ षटकांत १९६ धावांत गुंडाळला. पहिल्या डावात ४२९ धावा केल्यावर मुंबईने चंदीगडला ७८ धावांत गारद करून त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता. मुंबईने ३५१ धावांची मोठी आघाडी मिळवली होती. पहिल्या डावात हॅटट्रिक घेणाऱ्या तुषार देशपांडेने दुसऱ्या डावात २ बळी घेतले. त्याला मोहित अवस्थी व सेल्व्हेस्टर डीसोझा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून उत्तम साथ दिली. एकूणच या पाच गोलंदाजांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबईने तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात विजयासह बोनस गुण (एकूण ७) कमावला व गटात अग्रस्थान काबिज केले. रणजी स्पर्धेत डावाने अथवा १० गडी राखून विजय मिळवल्यास बोनस गुण देण्यात येतो. आता १८ ऑक्टोबरपासून मुंबईची बिलासपूर येथे हिमाचल प्रदेशशी दुसऱ्या सामन्यात गाठ पडेल.

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवण्यासह पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या कामगिरीकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वीच जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल.

गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २०२७ मध्ये १७ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ९ फेब्रुवारीपासून उपांत्यपूर्व फेरी, १८ फेब्रुवारीपासून उपांत्य फेरी, तर २७ फेब्रुवारीपासून महाअंतिम सामना रंगेल.

तत्पूर्वी, सोमवारच्या १ बाद ० धावावरून पुढे खेळताना चंदीगडच्या फलंदाजांना काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अर्जुन आझादने ६२, तर शिवम भांब्रीने ४४ धावा केल्या. एकवेळ चंदीगड संघ २ बाद ८७ अशा सुस्थितीत होता. मात्र देशपांडेने कर्णधार मनन वोहराचा (१४), तर मुलाणीने आझादचा अडसर दूर केला व त्यांचा डाव पुन्हा घसरला. ३ बाद १०१ वरून त्यांची ६ बाद १२० अशी अवस्था झाली. तनुषने मग तळाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. तनुषनेच जगजीत सिंगला बाद करून मुंबईच्या विजयावर ५३व्या षटकात थाटात शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई (पहिला डाव) : १३६.५ षटकांत सर्व बाद ४२९

  • चंदीगड (पहिला डाव) : १९.१ षटकांत सर्व बाद ७८ (निशुंक बिर्ला ३३; तुषार देशपांडे ५/१७)

  • चंदीगड (दुसरा डाव) : ५२.१ षटकांत सर्व बाद १९६ (अर्जुन आझाद ६२, शिवम भांब्री ४४; तनुष कोटियन ३/३०, शम्स मुलाणी ३/६९)

  • सामनावीर : तुषार देशपांडे

  • निकाल : मुंबई विजयी (७ गुण)

महाराष्ट्राची दुसऱ्या डावात घसरगुंडी

नवी दिल्ली : पालम मैदान, मॉडेल स्पोर्ट्स कॉम्पेक्स येथे सुरू असलेल्या क-गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राने सेनादलविरुद्ध पहिल्या डावात १०६ धावांची आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात त्यांची तिसऱ्या दिवसअखेर २८ षटकांत ६ बाद ६६ अशी घसरगुंडी उडाली आहे. महाराष्ट्राकडे एकूण १७२ धावांची आघाडी असून दिवसअखेर अंकित बावणे ३२, तर सौरभ नवाळे १२ धावांवर नाबाद आहे. कर्णधार पृथ्वी शॉ (७), दिग्विजय पाटील (३), सिद्धेश वीर (६) यांनी दुसऱ्या डावात निराशा केली. पहिल्या डावात महाराष्ट्राने ३३३ धावा केल्यावर हितेश वाळूंजच्या पाच बळीमुळे सेनादलला २२७ धावांत रोखले. नितीन तन्वरने ६१ धावांची खेळी साकारली. महाराष्ट्राला साखळी फेरीत सेनादलसह बंगाल, दिल्ली, गुजरात, झारखंड, केरळ, ओदिशा या संघांशी दोन हात करायचे आहेत. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत पृथ्वी व अंकित यांच्यावर महाराष्ट्राची फलंदाजी अवलंबून आहे.

मोखाडे-रेखाडेमुळे विदर्भाला आघाडी

नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या अ-गटातील लढतीत विदर्भाने पुद्दुचेरीविरुद्ध पहिल्या डावात ११५ धावांची निर्णायक आघाडी मिळवली. अमन मोखाडे (३५ धावांत ३ बळी) व पार्थ रेखाडे (६४ धावांत ३ बळी) या फिरकी जोडीला याचे श्रेय जाते. मुख्य म्हणजे सलामीवीर अमनने फलंदाजीत छाप पाडण्यासह गोलंदाजीद्वारेही सर्वांची मने जिंकली. विदर्भाच्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात पुद्दुचेरी संघ पहिल्या डावात ३३३ धावाच करू शकला. रितेश गुडघेने ९५ धावांची झुंज दिली. तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात १ बाद २२ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे आता एकूण १३७ धावांची आघाडी असून अमन १५, तर हर्ष दुबे शून्यावर नाबाद आहे. रवी समर्थ ७ धावांवर बाद झाला. विदर्भाला अ-गटात पुद्दुचेरीसह बडोदा, बिहार, गोवा, गतविजेता जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांच्याविरुद्ध लढायचे आहे. २०२५मध्ये विदर्भाने तिसऱ्यांदा रणजीचे जेतेपद पटकावले होते.

आयुषला गंभीर दुखापत; किमान महिनाभर संघाबाहेर

मुंबई : मुंबईचा युवा फलंदाज तसेच उपकर्णधार आयुष म्हात्रेच्या उजव्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत. त्याला ग्रेड ४ टियरची गंभीर दुखापत झाली असून किमान चार ते सहा आठवडे तो क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

वर्षाच्या सुरुवातीला भारताला १९ वर्षांखालील विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणाऱ्या आयुषने चंदीगडविरुद्ध पहिल्या डावात ४८ धावा केल्या. यावेळीच धावताना तो काहीसा लंगडताना दिसला. आयुषला यापूर्वी आयपीएलमध्येही चेन्नईकडून खेळताना १८ एप्रिलला स्नायूंचीच दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण हंगामाला मुकला.

मुंबईचा कर्णधार सिद्धेशने फलंदाजी करताना आयुषला हा त्रास झाल्याचे सांगितले. “आयुष हा सामना सुरू असताना ज्या प्रकारे लंगडत होता, त्यावरून तो दुसरा किंवा तिसरा सामना खेळू शकणार नाही असे दिसते,” असे सिद्धेशने पत्रकारांना सांगितले. त्यामुळे मुंबईची चिंता बळावली असून सूर्यकुमार यादवला या निमित्ताने संघात स्थान मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, रणजीच्या दुसऱ्या सामन्यासाठी मुंबईचा संघ १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान बिलासपूर येथे जाणार आहे. जैस्वाल न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत-अ संघात सामील होणार असल्याने मुंबईला या सामन्यात नवीन जोडी मैदानात उतरवावी लागणार आहे. २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान भारत-अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in