हॅटट्रिकवीर शार्दूलमुळे मुंबईचे वर्चस्व! मेघालयचा पहिला डाव ८६ धावांत संपुष्टात; रहाणे, लाड यांच्या अर्धशतकांमुळे मुंबई २ बाद २१३

क्रिकेट विश्वात ‘लॉर्ड’ नावाने लोकप्रिय असलेल्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरने (४३ धावांत ४ बळी) गुरुवारी हॅटट्रिक मिळवत छाप पाडली.
हॅटट्रिकवीर शार्दूलमुळे मुंबईचे वर्चस्व! मेघालयचा पहिला डाव ८६ धावांत संपुष्टात; रहाणे, लाड यांच्या अर्धशतकांमुळे मुंबई २ बाद २१३
एक्स @CricCrazyJohns
Published on

मुंबई : क्रिकेट विश्वात ‘लॉर्ड’ नावाने लोकप्रिय असलेल्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरने (४३ धावांत ४ बळी) गुरुवारी हॅटट्रिक मिळवत छाप पाडली. शार्दूलला मोहित अवस्थी (२७ धावांत ३ बळी), सेल्व्हेस्टर डिसोझा (१४ धावांत २ बळी) या अन्य वेगवान गोलंदाजांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने मेघालयचा पहिला डाव २४.३ षटकांत ८६ धावांत गुंडाळला.

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अ-गटातील या सामन्यात मग पहिल्या दिवसअखेर मुंबईने ५९ षटकांत २ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार अजिंक्य रहाणे (१५२ चेंडूंत नाबाद ८३ धावा) आणि अनुभवी सिद्धेश लाड (१५५ चेंडूंत नाबाद ८९) यांनी दमदार अर्धशतके झळकावतानाच तिसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भर घातली आहे. त्यामुळे मुंबई पहिल्या दिवसअखेर १२७ धावांनी आघाडीवर असून बोनस गुणासह विजय मिळवण्यासाठी ते पुढील ३ दिवस जोरदार प्रयत्न करतील.

गतविजेत्या मुंबईला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी ही लढत जिंकण्यासह जम्मू-काश्मीर आणि बडोदा यांच्यातील लढतीच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागेल. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल या प्रमुख खेळाडूंच्या त्रिकुटाने आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या दृष्टीने या लढतीतून विश्रांती घेतली आहे. तसेच शिवम दुबे टी-२० मालिकेत खेळत आहे. त्यामुळे सूर्यांश शेडगे, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड यांचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले. तर कर्श कोठारी व हार्दिक तामोरे यांच्या जागी डिसोझा व आकाश आनंद यांना संधी देण्यात आली.

मुंबईचा संघ अ-गटात २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईने ६ पैकी ३ सामने जिंकले असून १ लढत अनिर्णित राहिली आहे. दोन लढतींमध्ये मुंबईचा पराभव झालेला आहे. गेल्या सामन्यात मुंबईने जम्मूकडून पराभव पत्करल्याने त्यांचे समीकरण किचकट झाले आहे. मुंबईने मेघालयाला बोनस गुणासह नमवले, तर त्यांचे २९ गुण होतील. मग जम्मूने बडोद्याला नमवले, तर मुंबई दुसऱ्या स्थानासह आगेकूच करेल. मात्र बडोद्याने जम्मूला हरवले, तर मुंबई व जम्मूचे समान २९ गुण होऊ शकतात. अशा स्थितीत धावगती निर्णायक ठरेल.

दरम्यान, गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रहाणेचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिल्याच षटकात शार्दूलने निशांत चक्रवर्तीला (०) बाद केले. मग दुसऱ्या षटकात मोहितने किशन ल्योंडगाला शून्यावर माघारी पाठवले. तिसऱ्या षटकात शार्दूलने धमाल उडवाताना हॅटट्रिक साकारली. त्याने चौथ्या चेंडूवर अनिरुद्धचा त्रिफळा उडवला. मग सुमीत कुमारला स्लीपमध्ये बाद केले. सहाव्या चेंडूवर जसकिरत सिंगला त्रिफळाचीत करून शार्दूलने हॅटट्रिक पूर्ण केली. चौथ्या षटकात मोहितने अर्पित भटेवाराला (२) बाद करून मेघालयची ६ बाद २ धावा अशी अवस्था झाली.

पहिल्याच चार षटकांतच सहा फलंदाज गमावल्यावर कर्णधार आकाश चौधरी (१६) व प्रिंगसंग संगमा (१९) यांनी काहीसा प्रतिकार केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३८ धावांची भर घातली. डीसोझाने ही जोडी फोडली. त्यानंतर १०व्या क्रमांकावरील हिमन फुकानने २४ चेंडूंत २८ धावा फटकावून मेघालयला किमान ८० धावांपलीकडे नेले. शम्स मुलाणीने हिमनला बाद करून मेघालयचा डाव ८६ धावांवर गुंडाळला.

त्यानंतर पहिल्या डावात मुंबईची सुरुवातही खराब झाली. १७ वर्षीय आयुष ५ धावांवरच बाद झाला. तर अमोघ भतकल २८ धावा काढून माघारी परतला. २ बाद ४३ वरून मात्र रहाणे आणि लाड या अनुभवी फलंदाजांची जोडी जमली. ३२ वर्षीय लाडने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३०वे अर्धशतक साकारताना ११ चौकार व १ षटकार लगावला. तसेच रहाणेने ९ चौकार व १ षटकारासह ५९वे अर्धशतक पूर्ण केले. रहाणेचे यंदाच्या हंगामातील हे पहिलेच अर्धशतक ठरले. या दोघांनी जवळपास चार तास फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईने २०० धावांपलीकडे मजल मारून एकूण आघाडीसुद्धा १२७ धावांपर्यंत नेली.

आता शुक्रवारी रहाणे व लाड शतकी खेळी साकारून मुंबईला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेतील, अशी चाहत्यांना आशा आहे.

संक्षिप्त धावफलक

मेघालय (पहिला डाव) : २४.३ षटकांत सर्व बाद ८६ (हिमन फुकन २८, प्रिंगसंग संगमा १९; शार्दूल ठाकूर ४/४३, मोहित अवस्थी ३/२७)

मुंबई (पहिला डाव) : ५९ षटकांत २ बाद २१३ (सिद्धेश लाड नाबाद ८९, अजिंक्य रहाणे नाबाद ८३, अनिश चरक १/५०)

शार्दूलने या स्पर्धेत ७ सामन्यांत आतापर्यंत २० बळी मिळवले आहेत. तसेच फलंदाजीतही २९७ धावांचे योगदान दिले आहे.

शार्दूल हा मुंबईसाठी रणजी स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी जहांगीर खोत (वि. बडोदा, १९४४), उमेश कुलकर्णी (वि. गुजरात, १९६४), अब्दुल इस्माइल (वि. सौराष्ट्र, १९७४), रॉयस्टन डायस (वि. बिहार, २०२४) या चौघांनी अशी कामगिरी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in