मुंबई, आंध्र प्रदेश सुपर लीगमध्ये दाखल; आयुष म्हात्रेची दमदार अर्धशतकी खेळी

गेल्या सामन्यात केरळकडून पराभूत झाल्यानंतर बलाढ्य मुंबईने पुन्हा एकदा विजयीपथावर पुनरागमन केले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात शनिवारी छत्तीसगढचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबईने सुपर लीगमध्ये थाटात प्रवेश केला.
मुंबई, आंध्र प्रदेश सुपर लीगमध्ये दाखल
मुंबई, आंध्र प्रदेश सुपर लीगमध्ये दाखल
Published on

लखनौ : गेल्या सामन्यात केरळकडून पराभूत झाल्यानंतर बलाढ्य मुंबईने पुन्हा एकदा विजयीपथावर पुनरागमन केले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात शनिवारी छत्तीसगढचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबईने सुपर लीगमध्ये थाटात प्रवेश केला.

गटसाखळीतील एक फेरी शिल्लक असतानाच, मुंबईने सहा सामन्यांत पाच विजय मिळवत २० गुणांनिशी स्पर्धेच्या पुढच्या फेरीत मजल मारली. आंध्र प्रदेशनेही पाच सामने जिंकत २० गुणांसह आगेकूच केली. केरळकडून अवघ्या १५ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने ३ विकेट्स मिळवत छत्तीसगढला १९.४ षटकांत अवघ्या १२१ धावांवर रोखले.

मुंबईचा सलामीवीर आयुष म्हात्रे आणि अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी सलामीसाठी ८२ धावांची भागीदारी रचत मुंबईला १५.५ षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला. आयुष म्हात्रेने ३९ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ६९ धावांची खेळी साकारली. रहाणेने २८ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या.

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याने तिसऱ्याच षटकांत छत्तीसगढचा सलामीवीर अमित यादव (६) आणि कर्णधार अमनदीप खरे (०) यांना माघारी पाठवत मुंबईला चांगले यश मिळवून दिले. त्यानंतर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे (२ विकेट्स) आणि सूर्यांश शेडगे (२ बळी) यांनीही छत्तीसगढला हादरे देत त्यांची अवस्था ६ बाद ५५ अशी केली. छत्तीसगढचा संघ ७बाद ५९ अशा अवस्थेत असताना शुभम अगरवाल (१९) आणि मयांक यादव (२४) यांनी छत्तीसगढला शतकी धावांचा पल्ला पार करून दिला.

विजयासाठी ठेवलेले १२२ धावांचे उद्दिष्ट गाठताना फॉर्मात असलेल्या आयुष म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी रचल्यानंतर मुंबईच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी होती. आयुषने एका बाजूने केले. हल्ले चढवत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब छत्तीसगढकडून दोन बळी शुभम अगरवालने टिपले.

दुसऱ्या सामन्यात, संजू सॅमसनच्या ७३ धावांच्या नाबाद खेळीनंतरही केरळला आंध्र प्रदेशकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सॅमसन वगळता बाकीच्या सर्व फलंदाजांनी निराशा केल्यामुळे केरळला २० षटकांत ७ बाद ११९ धावाच करता आल्या. श्रीकर भारत (५३), अश्विन हेब्बार (२७) आणि पायला अविनाश (२०) यांच्या योगदानामुळे आंध्र प्रदेशने केरळवर सात विकेट्स आणि ४८ चेंडू शिल्लक राखून विजय मिळवला.

logo
marathi.freepressjournal.in