रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा दिमाखात प्रवेश

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ जून ते २७ जूनदरम्यान रणजी करंडकाच्या विजेतेपदासाठी लढत होणार
रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा दिमाखात प्रवेश

मुंबईने शनिवारी रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उत्तर प्रदेशविरुध्दचा सामना अनिर्णित राहिला; मात्र पहिल्या डावाच्या आघाडीवर मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने दोन्ही डावात शतकी खेळी केली. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ४२ विजेतेपद मिळविण्यासाठी आता मुंबईची गाठ मध्यप्रदेशशी पडणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ जून ते २७ जूनदरम्यान रणजी करंडकाच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

मुंबईला आपल्या बेचलाळीसाव्या विजेतेपदासाठी वेध लागले आहेत, तर चार वेळा विजेतेपदाला गवसणी घालणारा मध्यप्रदेश १९५३ नंतर प्रथमच विजेतेपद पटकाविण्यास उत्सुक असणार आहे.

मुंबईच्या फलंदाजांनी गेले पाच दिवस उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची अक्षरश: दमछाक केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने आपल्या पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. यात यशस्वी जैसवाल (१००) आणि हार्दिक तोमरे (११५) यांनी शतकी खेळी केली. उत्तर प्रदेशच्या सौरभ कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. उत्तर प्रदेशला आपल्या पहिल्या डावात १८० धावा करता आल्या. उत्तर प्रदेशकडून शिवम मावीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहिली. मुंबईने चार फलंदाजांच्या मोबदल्यात ५३३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबईकडून दुसऱ्याही डावात यशस्वी जैसवालने शतकी खेळी केली. त्याने ३७२ चेंडू खेळून १८१ धावा केल्या. अमन जाफरने २५९ चेंडूत १२७ धावांची शतकी खेळी केली.

कर्णधार पृथ्वी शॉने ७१ चेंडूत ६४ धावांची आक्रमक खेळी केली. सुवेद पारकर ४९ चेंडूंत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर सर्फराज खान (१०० चेंडूंत नाबाद ५९) आणि शम्स मुल्लाणी (८९ चेंडूंत नाबाद ५१) नाबाद अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशच्या ९ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. परंतु त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. प्रिन्स यादवने दोन बळी टिपले. शिवम मावी, सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in