
रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने उत्तराखंडचा ७२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक (२५२) झळकविणाऱ्या सुवेद पारकरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
मुंबईने या सामन्यात उत्तराखंडला विजयासाठी ७९५ धावांचे लक्ष्य दिले. परंतु उत्तराखंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ६९ धावांत गारद झाला. मुंबईकडून धवल कुलकर्णी, तनुष कोटियन, शम्स मुलानी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. मोहित अवस्थीने एक फलंदाज बाद केला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सने यापूर्वी १९२९-३० मध्ये क्वीन्सलँडवर ६८५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. मुंबईने तब्बल ९३ वर्षांनंतर हा विक्रम मोडला. रणजी करंडकात सर्वात मोठा विजय बंगालच्या नावावर होता. १९५-५४ मध्ये बंगालने ओडिशाचा ५४० धावांनी पराभव केला होता.
सुवेद पारकरने पदार्पणाच्या सामन्यातच झळकविलेले द्विशतक (२५२) आणि सर्फराज खानचे दीडशतक (१५३) याच्या जोरावर मुंबईने पहिला डाव ८ बाद ६४७ धावांवर घोषित केला होता.
उत्तराखंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या ११४ धावांत संपुष्टात आला. मुंबईने ५३३ धावांच्या आघाडीसह दुसरा डाव ३ बाद २६१ धावांवर घोषित करून उत्तराखंडला विजयासाठी ७९४ धावांचे मोठे आव्हान दिले. उत्तराखंडचे फलंदाज मोठ्या धावसंख्येपुढे झुकून अवघ्या ६९ धावांत गारद झाले.