धोनीकडे IPL च्या ‘ऑल टाइम ग्रेट’ संघाचं नेतृत्व, मुंबई इंडियन्सचा 'हिटमॅन' रोहितला मात्र वगळलं

मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वाखाली पाच वेळा चषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला या संघात स्थान मिळालं नाही, कारण...
Rohit Sharma
Rohit Sharma

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, माजी क्रिकेटपटू आणि निवडक क्रीडा पत्रकारांनी आयपीएलच्या आगामी हंगामाच्या निमित्ताने ‘ऑल टाइम ग्रेट’ संघाची निवड केली आहे. या संघाचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आले आहे. मात्र मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वाखाली पाच वेळा चषक उंचावून देणाऱ्या रोहित शर्माला या संघात स्थान लाभलेले नाही. तरीही मुंबईचेच सर्वाधिक ५ खेळाडू या संघात आहेत, हे विशेष.

२००८मध्ये आयपीएलला प्रारंभ झाल्यावर आतापर्यंत १६ हंगाम यशस्वीपणे पार पडले आहेत. १६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच २० फेब्रुवारी, २००८ रोजी आयपीएलच्या पहिला हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रकिया झाली होती. विश्वातील आघाडीची टी-२० लीग म्हणून आयपीएलचा नावलौकिक आहे. त्यासाठी वासिम अक्रम, मॅथ्यू हेडन, टॉम मूडी, डेल स्टेन या माजी क्रिकेटपटूंसह देशभरातील ७० क्रीडा पत्रकारांची मते लक्षात घेत १५ जणांचा समावेश असलेल्या ‘ऑल टाइम ग्रेट’ संघाची निवड करण्यात आली आहे.

या संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा व जसप्रीत बुमरा यांना स्थान लाभले आहे. चेन्नईच्या धोनी, सुरेश रैना व रवींद्र जडेजाचाही या संघात समावेश आहे. बंगळुरूचे विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स या संघात आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा चषक जिंकला असला, तरी खेळाडू म्हणून त्याची कामगिरी तितकी प्रभावी न राहिल्याने चाहत्यांनी तसेच अन्य परीक्षकांनी रोहितची निवड केली नसावी, असे परीक्षकांपैकीच एकाने स्पष्ट केले.

आयपीएलचा ‘ऑल टाइम ग्रेट’ संघ

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डीव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, केरॉन पोलार्ड, रशिद खान, सुनील नारायण, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा.

logo
marathi.freepressjournal.in