विजयपथावर परतण्यासाठी मुंबई-पंजाबमध्ये आज चुरस; मुल्लानपूर येथे उभय संघांत द्वंद्व, हार्दिकचे नेतृत्व आणि गोलंदाजीकडे लक्ष

हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ तूर्तास सहा सामन्यांतील दोन विजयांच्या चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. ३० वर्षीय हार्दिकला या स्पर्धेत अद्याप छाप पाडता आलेली नाही.
विजयपथावर परतण्यासाठी मुंबई-पंजाबमध्ये आज चुरस; मुल्लानपूर येथे उभय संघांत द्वंद्व, हार्दिकचे नेतृत्व आणि गोलंदाजीकडे लक्ष

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. दोन्ही संघांनी आपापली गेली लढत गमावल्याने विजयपथावर परतण्यासाठी त्यांच्यात कडवी चुरस असेल. मात्र प्रामुख्याने मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या तिहेरी कौशल्याचा या लढतीत कस लागेल.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ तूर्तास सहा सामन्यांतील दोन विजयांच्या चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. ३० वर्षीय हार्दिकला या स्पर्धेत अद्याप छाप पाडता आलेली नाही. विशेषत: चेन्नईविरुद्ध त्याने टाकलेले अखेरचे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले व मुंबईळा २० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय हार्दिकने नेतृत्व करताना घेतलेले काही निर्णयही भुवया उंचावणारे आहेत. मुंबईने स्पर्धेतील दोन्ही विजय हे घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडेवर मिळवले होते. त्यामुळे आता प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळताना हार्दिकसह मुंबईला सांघिक कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे कर्णधार शिखर धवन या लढतीसाठीसुद्धा अनुपलब्ध असल्याने सॅम करन पंजाबचे नेतृत्व करताना दिसेल. पंजाबला गेल्या सामन्यात राजस्थानने नमवले. त्यांचेही ६ सामन्यांत ४ गुण असून घरच्या मैदानावर पंजाबच्या संघाने आतापर्यंतच्या तीनपैकी दोन लढती गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही दडपण असेल. मुल्लानपूर येथील स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. येथील तीनपैकी दोन सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

रोहितचा २५०वा सामना; बुमरा लयीत

मुंबईचा माजी कर्णधार आणि चेन्नईविरुद्ध झुंजार शतक साकारणाऱ्या रोहित शर्माचा हा आयपीएल कारकीर्दीतील २५०वा सामना असेल. रोहितने या हंगामात मुंबईसाठी ६ सामन्यांत सर्वाधिक २६१ धावा केल्या आहेत. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. त्याशिवाय तिलक वर्माने हैदराबादविरुद्धचे अर्धशतक वगळता निराशा केली आहे. त्यामुळे हार्दिकसह त्याच्यावरही चाहत्यांचे लक्ष असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराने १० बळी मिळवून सातत्याने छाप पाडली आहे. मात्र त्याला अन्य गोलंदाजांकडून पुरेशी साथ लाभलेली नाही. जेराल्ड कोएट्झे, आकाश मढवाल यांना धावा रोखण्यात अपयश येत आहे. फिरकीपटू श्रेयस गोपाळने मात्र चांगली कामगिरी केली आहे.

पंजाबच्या बेअरस्टो, लिव्हिंगस्टोनवर दडपण

शशांक सिंग व आशुतोष शर्मा या दोन युवा भारतीय फलंदाजांनी पंजाबसाठी चमक दाखवली आहे. मात्र आघाडीच्या फळीचे अपयश पंजाबला महागात पडत आहे. धवनच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोनकडून पंजाबला योगदान अपेक्षित आहे. विशेषत: बेअरस्टोने सहा सामन्यांत फक्त ९६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, अर्शदीप सिंग व हर्षल पटेल या वेगवान त्रिकुटावर पंजाबची भिस्त आहे. अर्शदीप गेल्या सामन्यात महागडा ठरला होता. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास त्याला कामगिरी उंचवावी लागेल. फिरकीपटू हरप्रीत ब्रारने उत्तम योगदान दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in