मुंबईसाठी वानखेडे लकी ठरणार? पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्यासाठी आज राजस्थान रॉयल्सशी भिडणार; चाहत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईचे कर्णधारपद यंदा रोहित शर्माकडून हिसकावून घेत हार्दिककडे सोपवण्यात आले. मात्र गुजरात आणि हैदराबादकडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागल्याने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईसाठी वानखेडे लकी ठरणार? पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्यासाठी आज राजस्थान रॉयल्सशी भिडणार; चाहत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सोमवारी किमान घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा संघ पराभवाची कोंडी फोडणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईसमोर विजयाची हॅट्‌ट्रिक साकारण्यासाठी उत्सुक असलेल्या राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. त्याशिवाय या लढतीत मुंबईतील चाहते हार्दिकविरोधात काही शेरेबाजी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईचे कर्णधारपद यंदा रोहित शर्माकडून हिसकावून घेत हार्दिककडे सोपवण्यात आले. मात्र गुजरात आणि हैदराबादकडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागल्याने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय गोलंदाजीच्या वेळेस त्याने केलेले बदलही संघासाठी घातक ठरलेले आहेत. याव्यतिरिक्त हार्दिकला चाहत्यांकडून ‘ट्रोल’ केले जात आहे. स्टेडियममध्ये त्याच्याजवळ चेंडू येता अथवा तो फलंदाजीसाठी येता चाहते हार्दिकविरोधात टोलेबाजी करत आहेत. त्यामुळे या सर्व नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून हार्दिक स्वत:ची व संघाची कामगिरी कशी उंचावणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मुंबईचा संघ सोमवारी प्रथमच वानखेडेवर खेळणार आहे.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानने लखनऊ आणि दिल्ली या संघांना नमवून सलग दोन विजय नोंदवले आहेत. राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून मुंबईविरुद्ध गेल्या हंगामात वानखेडेवर त्यांना अखेरच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच मुंबईविरुद्ध गेल्या पाचपैकी ४ लढतींमध्ये राजस्थानला निराशेचा सामना करावा लागला आहे. म्हणूनच राजस्थान यावेळी कसा प्रतिकार करणार, याची चाहत्यांना उत्कंठा आहे.

वानखेडेची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन म्हणून पाहिली जाते. त्यामुळे येथे दुसऱ्या डावात १८० ते २०० धावांचा पाठलाग करणेही शक्य आहे. गेल्या वर्षी मुंबईने येथे सातपैकी पाच सामने जिंकले होते. तसेच दोनशेचे लक्ष्यही गाठले होते. त्यामुळे वानखेडे मुंबई इंडियन्ससाठी लकी ठरेल, अशी आशा मुंबईकर बाळगून आहेत.

सूर्यकुमार बाहेरच; रोहितकडून अपेक्षा

तारांकित फलंदाज सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो या लढतीलासुद्धा मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत मूळचा मुंबईकर तसेच चाहत्यांचा लाडका रोहित वानखेडेवर मोठी खेळी साकारेल, अशी अपेक्षा आहे. इशान किशन, नमन धीर यांनीही चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलणे गरजेचे आहे. हार्दिकला स्वत: अद्याप फलंदाजीत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तो अखेरच्या षटकात कशी फलंदाजी करतो, यावर मुंबईचे भवितव्य अवलंबून असेल. तिलक वर्मा व टिम डेव्हिड उत्तम लयीत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा मुंबईचा हुकमी एक्का असून १७ वर्षीय क्वेना माफकाला आणखी एक संधी मिळू शकते. शम्स मुलाणी व पियूष चावला या फिरकीपटूंनी अद्याप निराशा केलेली आहे. त्यामुळे कुमार कार्तिकेयचा पर्याय मुंबईकडे उपलब्ध आहे.

‘ती’ अफवाच

अहमदाबाद व हैदराबाद येथे चाहत्यांनी हार्दिकची हुर्यो उडवली होती. त्यामुळे वानखेडेवर ही शेरेबाजी रोखण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) अतिरिक्त पोलीस सुरक्षा मागवली आहे, असे वृत्त रविवारी सगळीकडे पसरले होते. मात्र एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.

पराग लयीत; यशस्वी, बटलरवर नजरा

रियान परागने दोन सामन्यांत ४३ आणि नाबाद ८४ अशी धावसंख्या रचली आहे. मात्र यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विशेषत: मुंबईकर यशस्वीने गेल्या वेळेस वानखेडेवर मुंबईविरुद्ध शतक झळकावले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. सॅमसननेही सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. शिम्रॉन हेटमायर व ध्रुव जुरेल यांना अखेरच्या षटकांत फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि नांद्रे बर्गर या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांपासून मुंबईला सावध रहावे लागेल. त्याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकीपटूंची जोडी राजस्थानसाठी कमाल करत आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल, असे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in