दोन गुणांसाठी आज कडवा संघर्ष; वानखेडेवर मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने

दोन गुणांसाठी आज कडवा संघर्ष; वानखेडेवर मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सुरुवातीचे सलग तीन सामने गमावले. गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान यांच्याकडून मुंबईने पराभव पत्करला. मात्र दिल्लीविरुद्ध मुंबईने वानखेडेवरच विजयाची बोहनी केली.

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामात गुरुवारी होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये दोन गुणांसाठी कडवा संघर्ष पाहायला मिळेल. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चाहत्यांना तारांकित खेळाडूंमधील जुगलबंदीसुद्धा अनुभवता येईल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सुरुवातीचे सलग तीन सामने गमावले. गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान यांच्याकडून मुंबईने पराभव पत्करला. मात्र दिल्लीविरुद्ध मुंबईने वानखेडेवरच विजयाची बोहनी केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास काहीसा बळावला आहे. मुंबईचा संघ तूर्तात ४ सामन्यांतील एका विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. बंगळुरूविरुद्ध मुंबईची आकडेवारी उत्तम असून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. माजी कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यास चाहते आतुर आहेत.

दुसरीकडे फॅफ डू प्लेसिसच्या बंगळुरूने पाचपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही या संघाला संघर्ष करावा लागत आहे. चेन्नईकडून पराभव पत्करल्यानंतर बंगळुरूने पंजाबला नमवले. मात्र त्यानंतर कोलकाता, लखनऊ, राजस्थान यांनी बंगळुरूला धूळ चारली. त्यामुळे हा संघ विजयपथावर परतण्यास उत्सुक आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असल्याने येथे २०० धावांचा पाठलाग करणेही शक्य आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला किमान २२० धावा करणे गरजेचे आहे.

विराट फॉर्मात, गोलंदाजांकडून अपेक्षा

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ३१६ धावांसह अग्रस्थानी असलेला विराट जबरदस्त फॉर्मात आहे. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभलेली नाही. विशेषत: डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन या विदेशी त्रिकुटाने निराशा केली आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर यांच्यावर दडपण येत आहे. गोलंदाजीतही बंगळुरूची स्थिती सारखीच आहे. राजस्थान, कोलकाता संघांविरुद्ध बंगळुरूला १८०हून अधिक धावांचा बचाव करता आला नाही. रीस टॉप्ली, मोहम्मद सिराज, यश दयाल असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. मात्र लॉकी फर्ग्युसन, फिरकीपटू करन शर्मा व ११ कोटींहून अधिक किमतीत खरेदी करण्यात आलेला अल्झारी जोसेफ यांना संघात स्थान मिळत नसल्याने बंगळुरू संघर्ष करत आहे.

तिकीटांचे भाव तिप्पट

मुंबई-बंगळुरू लढतीत विराट, रोहित, बुमरा यांसारखे खेळाडू आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या लढतीचे तिकीट मिळवण्यासाठी चाहते हवी ती रक्कम मोजण्यास तयार आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमबाहेर फेरफटका मारले असता चाहते दीड ते दोन हजारांचे तिकीट ५ ते ६ हजारांनाही विकत घेण्यास तयार आहेत. त्याशिवाय रविवारी होणाऱ्या मुंबई-चेन्नई सामन्यासाठीसुद्धा अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

रोहित, बुमरा, शेफर्ड लयीत; हार्दिकवर नजरा

रोहितने दिल्लीविरुद्ध झटपट ४९ धावा फटकावल्या. त्याशिवाय बुमरानेसुद्धा मोक्याच्या क्षणी बळी मिळवले. हे दोन्ही खेळाडू लयीत असल्याने मुंबईचा संघ हळूहळू रंगात येत आहे. दुखापतीतून सावरलेला सूर्यकुमार यादव छाप पाडण्यास सज्ज आहे. रोमारियो शेफर्ड आणि टिम डेव्हिड यांच्याकडे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. ‌विशेषत: शेफर्डने दिल्लीविरुद्ध केलेली कामगिरी सामन्याचा निकाल लावणारी ठरली. मात्र मुख्य लक्ष असेल ते कर्णधार हार्दिककडे. हार्दिकला चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे. त्यामुळे तो कर्णधार तसेच अष्टपैलू म्हणून कामगिरी उंचावून चाहत्यांची मने जिंकणार का, हे पाहणे रंजक ठरेल. जेराल्ड कोएट्झेने मुंबईसाठी आतापर्यंत सर्वाधिक ७ बळी घेतले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुशारा, विष्णू विनोद, नेहल वधेरा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

logo
marathi.freepressjournal.in