
इंडियन प्रीमियर लीग २०२३ला (IPL 2023) लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील चॅम्पियन समजल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा मागील हंगाम चांगला राहिला नव्हता. त्यामुळे आता या हंगामासाठी संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी म्हणजे नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी अनुभवी अरुणकुमार जगदीश यांची नियुक्ती संघाने केली आहे. १६ वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी कर्नाटक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
अरुणकुमार जगदीश यांनी १९९३ ते २००८ या कालावधीत भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आणि कर्नाटक संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली कर्नाटक संघाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये रणजी ट्रॉफी, इराणी चषक आणि विजय हजारे चषकमध्ये विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्यांनी २०१९-२० हंगामासाठी पुद्दुचेरीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. तर, २०२० पासून त्यांनी युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स त्यांच्या काय कमल करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.