IPL 2026 : रोहित-रिकल्टनचा तडाखा; मुंबईची ‘जर-तर’वर नौका

आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला ६ गडी व ८ चेंडू राखून धूळ चारली.
IPL 2026 : रोहित-रिकल्टनचा तडाखा; मुंबईची ‘जर-तर’वर नौका
IPL 2026 : रोहित-रिकल्टनचा तडाखा; मुंबईची ‘जर-तर’वर नौका
Published on

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला ६ गडी व ८ चेंडू राखून धूळ चारली. या लढतीत अनुभवी रोहित शर्मा (४४ चेंडूंत ८४ धावा) आणि रायन रिकल्टन (३२ चेंडूंत ८३ धावा) यांच्या बॅटचा तडाखा पाहायला मिळाला. त्यामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान कायम असून जर-तरवरच त्यांची नौका तरंगत आहे.

वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २२८ धावांचा डोंगर उभारला. निकोलस पूरनने २१ चेंडूंत ६३ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे एकवेळ ७ षटकांतच १०० धावा गाठणारा लखनऊचा संघ किमान २५० धावांचा पल्ला गाठेल, असे वाटत होते. मात्र कॉर्बिन बोशने एकाच षटकात पूरन व मिचेल मार्श (४४) यांना बाद केले व लखनऊचा डाव घसरला. ऋषभ पंतही (१५) अपयशी ठरला.

मग रिकल्टन व सहा सामन्यांनी पुनरागमन करणारा रोहित यांनी धूमधडाका केला. दोघांनी ६५ चेंडूंत १४३ धावांची घणाघाती सलामी नोंदवली. रोहितने ६ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली, तर रिकल्टनने ६ चौकार व ८ षटकार लगावले. दोघांनाही शतकाने हुलकावणी दिली. मात्र नमन धीर (नाबाद २३) व विल जॅक्स (नाबाद १०) यांनी १८.४ षटकांत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईचा हा आयपीएलमधील सर्वात मोठा पाठलाग ठरला. मार्च महिन्यात कोलकाताविरुद्धच मुंबईने २२२ धावांचा पाठलाग केला होता.

या विजयानंतर मुंबईचे १० सामन्यांत ६ गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत नवव्या स्थानी असून त्यांना उर्वरित चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. अन्य संघांच्या निकालावरही मुंबईला अवलंबून रहावे लागेल. आता रविवारी मुंबईची बंगळुरूशी गाठ पडेल.

सॉल्ट मायदेशी रवाना

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फिल सॉल्ट हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. दिल्लीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना सॉल्टला दुखापत झाली होती. त्यानंतर बोटाला फ्रॅक्चर झाल्याने सॉल्ट आता मायदेशी म्हणजेच इंग्लंडला रवाना झाला आहे. बंगळुरूचे अद्याप पाच साखळी सामने बाकी आहेत. मात्र सॉल्ट कधी परतेल, याविषयी अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तूर्तास जेकब बेथल सॉल्टच्या जागी सलामीला येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in