MI vs LSG : मुंबईचे विजयी 'पंचक'; लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा, अष्टपैलू जॅक्स, बुमरा, रिकल्टन, सूर्या चमकले

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दर्दी युवा क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रविवारी मुंबई इंडियन्सने सलग पाचव्या विजयाचा पंच लगावला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबईने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला.
MI vs LSG : मुंबईचे विजयी 'पंचक'; लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा, अष्टपैलू जॅक्स, बुमरा, रिकल्टन, सूर्या चमकले
एक्स @hardikpandya7
Published on

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दर्दी युवा क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रविवारी मुंबई इंडियन्सने सलग पाचव्या विजयाचा पंच लगावला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबईने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला. अष्टपैलू कामगिरी करणारा विल जॅक्स (२९ धावा आणि २ बळी) मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्यकुमार यादव (२८ चेंडूंत ५४ धावा), रायन रिकल्टन (३२ चेंडूंत ५८), जसप्रीत बुमरा (२२ धावांत ४ बळी) आणि ट्रेंट बोल्ट (२० धावांत ३ बळी) यांनीही अप्रतिम योगदान दिले. विजयी पंचकाच्या बळावर मुंबईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

'एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल' या मोहिमेंतर्गत दरवर्षी आयपीएलमध्ये मुंबईचा एक सामना वानखेडेवर दुपारी खेळवण्यात येतो. या लढतीसाठी विविध सेवाभावी संस्था आणि शाळांमधील

तब्बल १९,००० मुलांना वानखेडेवर आणण्यात आले. या मुलांचा आनंद मुंबईने द्विगुणीत केला. मुंबईने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ २० षटकांत १६१ धावांत गारद झाला. आयुष बदोनी (३५ धावा), मिचेल मार्श (३४ धावा) यांनीच लखनऊकडून काहीशी झुंज दिली. मात्र बुमरा-बोल्टची वेगवान जोडी आणि जॅक्सच्या फिरकीपुढे लखनऊचा निभाव लागला नाही. एकंदर १० सामन्यांतील सहावा विजय नोंदवून मुंबईने बाद फेरीच्या शर्यतीत आपले स्थान आणखी भक्कम केले.

तत्पूर्वी, लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईने या लढतीसाठी जायबंदी मिचेल सँटनरच्या जागी कर्ण शर्माला संधी दिली. तसेच कॉर्बन बोशचे पदार्पण झाले. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेषत: रोहितने मयांक यादवला सलग दोन षटकार लगावले. मात्र त्याच षटकातील अखेरचा चेंडूवर रोहित बाद झाला. त्याने पाच चेंडूत १२ धावा केल्या. यानंतर रिकल्टन आणि जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी झटपट ५५ धावांची भागीदारी रचली. रिकल्टनने ६ चौकार व ४ षटकारांसह यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक साकारले. दिग्वेश राठीने त्याचा अडसर दूर केला, त्यानंतर जॅक्सही २९ धावांवर माघारी परतला.

चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमारने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने २८ चेंडूंत ५४ धावा फटकावताना यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक साकारले. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही अग्रस्थान मिळवले. आवेश खानने सूर्यकुमारला बाद केले. त्यानंतर तिलक वर्मा (६ धावा), कर्णधार हार्दिक पंड्या (५ धावा) यांनी निराशा केली. मात्र नमन धीर (नाबाद २५ धावा) आणि बोश (२० धावा) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे मुंबईने २० षटकांत ७ बाद २१५ धावांचा डोंगर उभारला.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने तिसऱ्याच षटकांत मार्करमला (९ धावा) गमावले. बुमराने त्याला बाद केले. धोकादायक निकोलस पूरनने दीपक चहरला ३ षटकार लगावले. मात्र जॅक्सने एकाच षटकात पूरन आणि पंतचा बळी मिळवून मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिले. आयुष बदोनी व मिचेल मार्श यांनी फटकेबाजी करून एकवेळ सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र बोल्टने या दोघांना बाद केले. बुमराने मग मिलरचा अडसर दूर केला.

मुंबईचा हा आयपीएलच्या इतिहासातील १५०वा विजय ठरला. तसेच लखनऊविरुद्ध मुंबईने प्रथमच साखळी फेरीत लढत जिंकली.

मुंबईने आयपीएलमध्ये विक्रमी १६ वेळा २०० धावांचा यशस्वी बचाव केला. प्रथम फलंदाजी करताना २०० हून अधिक धावा केल्यावर मुंबईने आजवर एकही सामना गमावलेला नाही.

छोट्या क्रीडाप्रेमींनी वानखेडे दणाणले!

रविवारचा सामना हा खास विविध सेवाभावी संस्था आणि शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी होता. या सर्वांनी सामन्याचा पुरेपूर आनंद लुटताना रोहित, हार्दिक, सूर्यकुमारच्या नावाचा जयघोष केला. या मुलांची शिस्तबद्धताही कौतुकास्पद होती. स्टेडियममध्ये बसणे, येण्यापासून ते सामना संपल्यावर रांगेत जाण्यापर्यंत त्यांनी सर्व आदेशाचे पालन केले. तसेच मुंबई इंडियन्सने त्यांच्या खाण्याचीही काळजी घेतली. या सामन्यासाठी स्टेडियम बाहेर कित्येक चाहते तिकीट मिळेल का, अशी विचारणा करत होते.

logo
marathi.freepressjournal.in