मुंबई इंडियन्सचा मलिंगा, म्हांब्रे, हॉपकिन्सन यांना अलविदा; IPL साठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी प्रशिक्षकीय फळीत पूर्ण बदल

आयपीएल २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक फळीत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई इंडियन्सचा मलिंगा, म्हांब्रे, हॉपकिन्सन यांना अलविदा; IPL साठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी प्रशिक्षकीय फळीत पूर्ण बदल
मुंबई इंडियन्सचा मलिंगा, म्हांब्रे, हॉपकिन्सन यांना अलविदा; IPL साठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी प्रशिक्षकीय फळीत पूर्ण बदल X - mipaltan
Published on: 

मुंबई : आयपीएल २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक फळीत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि पारस म्हांब्रे, तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांना मुंबई इंडियन्सने अलविदा केला आहे.

यापूर्वी गेल्याच आठवड्यात मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या जागी किरॉन पोलार्डची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकवर्गात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळाले आहेत. मुंबई इंडियन्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे संघाच्या प्रशिक्षकवर्गातील आपापल्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत आहेत. फ्रँचायझीने तिघांचेही योगदान, समर्पण आणि सेवेसाठी आभार मानले.

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याचे मुंबई इंडियन्सशी अनेक वर्षांचे नाते राहिले आहे. खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर त्याने संघाच्या प्रशिक्षकवर्गातही महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबई इंडियन्सने मलिंगाचा गौरव करताना त्याला फ्रँचायझीच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हटले. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना त्याने संघाला चार आयपीएल विजेतेपदांसह २०११ मधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणूनही त्याने संघासोबत काम केले.

पारस म्हांब्रे यांचेही मुंबई इंडियन्सशी जुने नाते आहे. त्यांनी २०१० ते २०१७ या कालावधीत फ्रँचायझीसोबत काम केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा मुंबईच्या प्रशिक्षकवर्गात प्रवेश केला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकवर्गातील कार्यकाळ ऑक्टोबर २०२४ मध्ये संपल्यानंतर ते मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी झाले होते. हॉपकिन्सन आयपीएल २०२५ च्या आधी मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाले होते.

रोहित कर्णधार की तिलक, सूर्याला संधी?

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या नसेल, हे आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले जाईल की तिलक वर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल, हे पाहणे रंजक ठरेल. मुख्य प्रशिक्षकपदावरून महेला जयवर्धने यांची झालेली बदली आणि त्यानंतर तीन प्रमुख प्रशिक्षकांची एक्झिट यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघबांधणीत मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलार्ड यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षकवर्ग आयपीएल २०२७ साठी कोणती रणनीती आखतो आणि संघाच्या कामगिरीत काय बदल घडवतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला गेल्या सहा वर्षांत एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे २०२७मध्ये मुंबई कशी कामगिरी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल. हार्दिकच्या ट्रेडकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)