जेतेपद राखण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वास; महिला प्रीमियर लीगचे दुसरे पर्व लवकरच होणार सुरू

भारतीय युवा खेळाडूंची उत्तम फळी व विदेशातील अनुभवी खेळाडू ही मुंबईसाठी जमेची बाजू ठरली.
जेतेपद राखण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वास; महिला प्रीमियर लीगचे दुसरे पर्व लवकरच होणार सुरू

मुंबई : कोणत्याही संघासाठी एखाद्या स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यापेक्षा ते टिकवणे अधिक आव्हानात्मक असते. परिस्थितीशी जो संघ लवकर जुळवून घेईल, तोच यशस्वी होईल, अशा प्रतिक्रिया मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली. महिला आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या पर्वाला २३ फेब्रुवारीपासून बंगळुरू व नवी दिल्ली येथे प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत मुंबईचा संघ जेतेपद राखण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही हरमनप्रीतने व्यक्त केला.

गतवर्षी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबईने डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम जिंकला. भारतीय युवा खेळाडूंची उत्तम फळी व विदेशातील अनुभवी खेळाडू ही मुंबईसाठी जमेची बाजू ठरली. त्याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या हंगामासाठी बंगळुरूला रवाना होण्यापूर्वी हरमनप्रीतसह यास्तिका भाटिया, इजी वाँग हे खेळाडू तसेच मुंबईच्या मुख्य प्रशिक्षिका शेवलेट एडवर्ड्स आणि गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. मुंबईचा संघ २३ तारखेला सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे.

“बंगळुरू व दिल्ली येथील परिस्थिती मुंबईपेक्षा वेगळी असेल. गेला संपूर्ण हंगाम मुंबईत झाला होता. त्यामुळे आम्ही या आव्हानासाठी सज्ज आहोत. संघात यंदाही उत्तम खेळाडूंचा भरणा आहे. तेथील वातावरण तसेच खेळपट्ट्यांशी लवकरात लवकर जुळवून घेणे, हेच आमच्यासाठी निर्णायक ठरेल,” असे ३४ वर्षीय हरमनप्रीत म्हणाली. हरमनप्रीत या हंगामातही चौथ्या स्थानीच खेळणार असून मुंबईच्या संघात यास्तिका, पूजा वस्त्रकार, साईका इशाक, हायली मॅथ्यूज, नॅट शीव्हर-ब्रंट, अमेलिया कर, शबनिम इस्माइल यांसारख्या प्रतिभावान देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईचे पारडे जड आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in